प्रदीप भिडेंच्या आठवणींनी धामणीकर हळहळले.!!
![प्रदीप भिडेंच्या आठवणींनी धामणीकर हळहळले.!! pradeep bhide](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/pradeep-bhide-780x470.jpg)
लोणी-धामणी : प्रदीप जगन्नाथ भिडे यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे दुःख निधन झाले. वडील व आई रयत शिक्षण संस्थेत अध्यापनाचे काम करत होते. हडपसर व मंचर येथील रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमधून त्यांची बदली धामणी येथे १९६५ मध्ये झाली. भिडे दाम्पत्याला प्रदीप, दिलीप, स्वरुप आणि सीमा ही चार मुले होती. या चारही जणांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण धामणीच्या शाळेतच झाले. १९६९ मध्ये जुन्या अकरावी एस. एस. सी. परीक्षेत प्रदीप भिडे मंचर केंद्रात प्रथम आले होते. त्यांना त्यावेळी ८०.०४ टक्के गुण मिळालेले होते.
भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे दररोज पठण
भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय दररोज मोठ्या आवाजात म्हटलाच पाहिजे, असा घरातील दंडक होता. ‘विष्णुसहस्रनाम’ही म्हटले जायचे. त्यामुळे शुद्ध व स्पष्ट शब्दोच्चार व्हायला आणि ‘आवाज’ घडायला त्याची मोलाची मदत झाली. ‘ई-मर्क’ आणि ‘हिंदुस्थान लिव्हर’ या बहुराष्ट्रीय कंपन्यांत त्यांनी ‘जनसंपर्क अधिकारी’ म्हणून सुरुवातीला काही काळ नोकरीही केली. मुंबई दूरदर्शन केंद्र १९७२ मध्ये सुरू झाले आणि १९७४ च्या डिसेंबर महिन्यात ते वृत्तनिवेदक म्हणून नोकरीला लागले.
अकरावीनंतर प्रदीप भिडे यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेची पदवी संपादन केली. काही दिवस त्यांनी पुण्यातील विशाल सह्याद्री या दैनिकात बातमीदार म्हणून काम केले. त्यावेळी विशाल सह्याद्रीत ज्येष्ठ पत्रकार कै. वरुणराज भिडे त्यांचे सहाध्यायी होते. धामणी (ता. आबेगाव) येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील वर्गमित्र किसनराव पाटील जाधव. बाळकृष्ण गाढवे. रामदास नेहूलकर, कै. दादाभाऊ भुमकर, कै. पोपटलाल पगारीया हे होते.
प्रदीप भिडे यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच आपल्या भारदस्त आवाजाने आकाशवाणी पुणे केंद्रात बातम्या सांगण्याचे काम केलेले होते. यावेळी त्यांनी धामणी येथील श्री म्हाळसाकांत खंडोबा मंदीर पुरातन राममंदिर जयहिंद वाचनालय व धामणीचे कै. जयवंतरावभाऊ जाधव, बाबूरावदादा पाटील, बेरी गुरुजी व रामभाऊ आळेकर यांच्या कर्तृत्वाची महती आकाशवाणीवर त्या काळी प्रसारित केलेली होती.
ती त्या काळी खूप गाजलेली होती. भिडे कुटुंबीय धामणीला पेठेत मारुती मंदिराजवळ राहत होते. त्यावेळी त्यांच्या राहत्या घरासमोर मारुतीआप्पा जाधव यांचे चहाचे हॉटेल होते. आप्पा आपल्या खास शैलीत हॉटेलात येणार्या ग्राहकांना गमतीने काय काखाळं या आवाजाने बोलवायचे या त्यांच्या काय काखाळं या वाक्याला प्रदीप भिडे यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेले होते. भिडे कुटुंबीय हे धामणीला व खंडोबाच्या दर्शनाला कायम येत असत.