वाबळेवाडीची शाळा जिल्ह्यात अव्वल

शिक्रापूर | महाराष्ट्र शासनाने शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात शासकीय गटात शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचे अकरा लाखांचे पारितोषिक पटकावले असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका शरीफा तांबोळी यांनी दिली आहे.
शिरुर येथील वाबळेवाडीतील आंतरराष्ट्रीय शिक्षण देणारी पहिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असा नावलौकिक मिळवलेल्या वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेने गुणवत्ता राखत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत बाजी मारली, भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे सदर योजनेसाठी निश्चित करण्यात आली होती. तसेच शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंड ओळख, अंगभूत कला क्रीडा गुणांचा विकास अशा अनेकविध निकषांचा अंतर्भाव करण्यात आला होता. हे सर्व निकष पूर्ण करत शाळेने यश संपादित केले आहे. शाळेत गुणवत्ता विकास वाढीसाठी सर्वच परीक्षांमध्ये विक्रमी यश संपादन करत राज्यभर आपल्या नावाचा डंका निर्माण केला आहे, शाळेत राज्यातील अनेक शाळा, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समित्या, ग्रामस्थ, अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी अभ्यास भेटी दिल्या आहेत.
शाळेने नुकतेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचे अकरा लाखांचे पारितोषिक पटकावले असताना शाळेची उत्तम गुणवत्ता कायम राखत विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे यशस्वी प्रवास कायम राखण्याचा निर्धार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप वाबळे व ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे यांनी व्यक्त केला आहे, तर शाळेच्या यशाबद्दल केंद्रप्रमुख प्रकाश लंघे, शिक्षण विस्ताराधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी अभिनंदन केले आहे.