आई सुखरूप हवी असेल, तर 17 लाख रूपये दे…; पुण्यात अपहरण करत खंडणीची मागणी

पुणे | Pune Crime – पुण्यात (Pune) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन महिलांचे अपहरण करत खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील उत्तमनगर परिसरात स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष महिलेसह दोघींचं अपहरण करत त्यांच्याकडे 17 लाख रूपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकानं आरोपीसह त्याच्या तीन साथादारांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणात बाबूलाल मोहोळ, अमर मोहिते, अक्षय फड आणि प्रदीप नलवडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात पीडित महिलेनं आणि तिच्या मैत्रिणींनी बाबूलालला स्टॉल मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं तसंच त्यांनी बाबूलालकडून काही रक्कम देखील घेतली होती. पण स्टॉल न मिळाल्यामुळे बाबूलाल आणि त्याच्या साथीदारांनी वारजे आणि कात्रज परिसरातून दोन महिलांचे अपहरण केलं. तसंच आरोपींनी यातील एका महिलेच्या घरी फोन करत तिच्या मुलाकडे 17 लाख रूपये खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास महिलांना ठार करण्याची धमकी देखील आरोपींनी दिली. त्यानंतर घाबरलेल्या मुलानं पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
उत्तमनगरमध्ये पीडित महिलांना आरोपींनी त्यांच्या घरात डांबून ठेवलं होतं. यावेळी त्यांनी महिलांना मारहाण देखील केली होती. तर पोलिसांना याबाबतची माहिती समजताच त्यांनी या महिलांची सुटका केली आणि आरोपींना अटक केली. सध्या जखमी अवस्थेत असलेल्या पीडित महिलांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.