दोन वर्षांनंतर रमजान ईद उत्साहात साजरी

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दोन वर्षांनंतर प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक असलेली रमजान ईद पिंपरी-चिंचवड शहरात (मंगळवारी) उत्साहात साजरी करण्यात आली. नमाजपठण झाल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेत ‘ईद मुबारक’ म्हणत मुस्लिम बांधव शुभेच्छा देत होते.
रमजान महिन्यात इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद सल्ललाहू अलैही व सल्लम यांचा सर्वात प्रिय महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो. या महिन्याची सुरुवात २ एप्रिल रोजी चंद्रदर्शनाने झाली. त्याच्या दुसर्या दिवसापासून म्हणजे ३ एप्रिलपासून लहानांपासून थोरांपर्यंत सर्व वयोगटातील मुस्लिम बांधवांनी रोजा (उपवास) महिनाभर केला. या महिनाभरात रोजा, नमाज, रात्रीची तराबिह विशेष नमाज, शबे कद्रची रात्र, कुरआन पठण, जकातुल फित्र आदी संपन्न झाले. अनेक बांधवांनी पाच वेळची नमाज पठण केली.
पिंपरी : गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे मुस्लिम बांधव ईद घरीच साजरी करत होते. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारनेदेखील ईद पारंपरिकपणे साजरी करण्यास परवानगी दिली. ईदची नमाज पठणापूर्वी श्रीमंत, सधन आणि चांगली आर्थिक परिस्थिती असणार्यांनी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमागे अडीच किलो धान्य किंवा तेवढी रक्कम आर्थिक परिस्थिती कमकुवत असणार्या गरीब कुटुंबांना दान म्हणून देण्यात आले. जेणेकरून गरिबातील गरिबालासुद्धा ईद साजरी करता यावी. चंद्रदर्शन झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात ईद उत्साहात साजरी करण्यात आली.
भल्या सकाळीच मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून, अत्तर, सुवासिक तेल लावून सगळ्यांची पावले जवळच्या मशीद व मदरशाकडे वळाली. चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड स्टेशन, मोहननगर, चिखली घरकुल, खराळवाडी, पिंपरी, नेहरूनगर, इंद्रायणीनगर, लांडेवाडी, भोसरी, पिंपरी, काळेवाडी, कस्पटेवस्ती, थेरगाव-वाकड, काळाखडक, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, नवी सांगवी, जुनी सांगवी, निगडी, आकुर्डी, दळवीनगर, कासारवाडी, दापोडी आदी परिसरात मशीद व मदरशांमध्ये मौलानांनी मुस्लिम बांधवांना नमाज पढविला, नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. चिमुकल्या मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
चिंचवडगाव येथील आलमगीर शाहिद मशीदमध्ये मौलाना मिनहाज उद्दीन यांनी मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन केले. या रमजान महिन्यामध्ये शुक्रवारची व रमजान सणाच्या वेळेला जशी नमाज पठण करता, तसे न करता नियमित दररोज पाच वेळेस नमाज पठण करावे. ज्या चुका केलेल्या आहेत, त्याची क्षमा अल्लाहजवळ मागा, सत्याची कास अंगिकारा, मुलांवर चांगले संस्कार आई-वडिलांनी करावे, असे आवाहन करून रमजान सणाची माहिती विशद केली.
यावेळी आलमगीर शाही मशीदचे पदाधिकार्यांनी पोलिस उपायुक्त मंचक अप्पर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देताना उपायुक्त मंचक अप्पर म्हणाले, आज तुमचा मोठा आनंदाचा दिवस आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेली २ वर्षे घरीच ईद साजरी केली. मुस्लिम बांधवांनी एकोपाने राहून एकमेकांच्या सुखःदुखात सामील होत समाज एकोप्याचे दर्शन घडवावे. यावेळी माजी महापौर आझम पानसरे, निहाल पानसरे यांच्या उपस्थितीत इम्रान पानसरे, अख्तर पिंजारी, नाजीम बसरी, इक्बाल शेख, इक्बाल मुलानी आदींनी संयोजन केले. यावेळी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
निगडी येथील नुरानी मशीदमध्ये मौल्लाना शाहीद सलाम रेहमान व हाफिज जहुर अहमद यांनी नमाज पढविला. तेथे रशीद शेख, लियाकत शेख,ं मुजीब शेख, समद मुल्ला आदींनी व्यवस्थापन केले. आकुर्डीत मदिना मशीद, अक्सा मशीद, निगडी ट्रान्सपोर्टनगरमध्ये फातीमा मशीद, नुरूल इस्लाम मशीद, कस्तुरी मार्केटमध्ये शमशूल, उलूम मशीदमध्ये नमाज पढविण्यात आला. चिंचवड स्टेशन येथील दवा बाझार येथील समा ए दिन ए आदब मशीदमध्ये नमाज पठण झाले. अध्यक्ष अब्दुलकदीर मन्यार, जाकीर मेमन आदी उपस्थित होते.