ताज्या बातम्यारणधुमाळी

राऊतांच्या सुटकेनंतर ठाकरेंची तोफ धडाडली; म्हणाले, “पाळीव प्राण्याप्रमाणे…”

मुंबई | Uddhav Thackeray First Reaction After Sanjay Raut Bail Granted – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मिळाला असून शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आज (10 नोव्हेंबर) संजय राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) या तिघांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी राऊतांच्या जामिनावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “संजय राऊतांच्या जामिनानंतर झालेला आनंद याशिवाय दुसरी प्रतिक्रिया असूच शकत नाही. या आनंदाबरोबरच संजय राऊत यांच्या धाडसाचं कौतुक आहे. ते शिवसेनेचे नेते आहेत, शिवसेनेचे खासदार आहेत, सामनाचे कार्यकारी संपादक आहेत आणि त्याचबरोबर माझे जीवलग मित्रही आहेत. मित्र तोच असतो जो संकटाच्या काळता न डगमगता लढत असतो. तसा हा लढणारा मित्र आहे.”

“आता स्पष्ट झालं आहे. काल न्यायालयानं जो निकाल दिला त्या न्यायदेवतेचे मी आभार मानतो. या निकालपत्रात अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे काही निरीक्षणं त्यांनी नोंदवली आहेत. त्यामुळं हे जगजाहीर झालंय की केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत. सरकार त्यांना ज्याच्या अंगावर जा म्हणाले त्याच्या अंगावर जात आहेत. बेकायदेशीरपणे जात आहेत आणि हे सर्व जग बघत आहे”, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले, “मागील 8-15 दिवसांमधील केंद्रीय कायदामंत्री रिजूजू यांची वक्तव्य आता केंद्र सरकार न्यायदेवतेलाही आपल्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे की काय असं दाखवणारी आहेत. त्यांनी न्यायवृदांवरच शंका उपस्थित केली आहे. केंद्र सरकार न्यायालयालाच आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न करत असेल तर देशातील तमाम जनतेनं त्याचा विरोध केला पाहिजे.”

“न्याय देवतेवर भाष्य करणं हा सुद्धा गुन्हा आहे. त्यावर केंद्रीय कायदा मंत्रीच भाष्य करत आहे. हा गुन्हा होऊ शकतो का याची दखल न्याय देवता घेईलच. पण एक नक्की की आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले, अनेक पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. बेकायदेशीर अटक केली जात आहे, केसेस केल्या जात आहेत,” असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये