नाराजीच्या काही गोष्टी उद्धव ठाकरेंच्या कानावर घातल्या पण…”; अजित पवारांचं वक्तव्य
मुंबई : (Ajit pawar On Uddhav Thackeray) सोमवारी ४ जुलै रोजी दोन दिवसीय विधानसभेच आधिवेशन संपल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते. शिवसेनेच्या बंडाळीवर बोलताना ते म्हणाले, हा पूर्णपणे शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं सांगत प्रत्येकाने आपआपल्या पक्षातील प्रश्न सोडवणे अपेक्षित असल्याचंही नमूद केलं.
दरम्यान पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, हा पूर्णपणे शिवसेनेच्या अंतर्गतचा प्रश्न आहे. आमचं तीन पक्षांचं सरकार होतं. राष्ट्रवादी पक्षांतर्गत जो प्रश्न असेल तो राष्ट्रवादीने, काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न काँग्रेसने सोडवायचा. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांचं, आमदारांचं काही म्हणणं असेल तर त्यावर आम्हाला हस्तक्षेप करण्याचा काहीही अधिकार नाही.
शिवसेना पक्षाबाबत काही गोष्टी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्या होत्या. त्यावर त्यांनी चर्चा करून मी निर्णय घेतो असं सांगितलं, अशी माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी दिली.