बाळासाहेबांच्या शेवटच्या ‘त्या’ शब्दाचे झळकले बॅनर; ठाकरेंचे शिवसैनिकांना भावनिक आवाहन

नाशिक : (Uddhav Thackeray On Balasaheb Thackeray) नाशिकजिल्ह्यातील मालेगाव शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सभा होत आहे. मालेगावात शिवसेनेने लावलेला एक बॅनर अधिक चर्चेत आला आहे. या बॅनरवर ‘जसं मला सांभाळलं, तसं माझ्या उद्धवला व आदित्यला सांभाळा’, असा उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान मालेगावात होणारी सभा एक ना अनेक कारणांमुळे चर्चेत येत असताना आता पुन्हा, ‘जसं मला सांभाळलं तसं माझ्या उद्धवल व आदित्यला सांभाळा’, असा आशयाचा बॅनर लावल्याने हा सभेचा बॅनर अधिक चर्चेत आला आहे. मालेगाव शहरात ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या सभेपासून साधारणत: अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या महात्मा फुले चौकात हा बॅनर लावण्यात आलेला आहे.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या शेवटच्या सभेत केलेल्या भाषणात शिवसैनिकांना आवाहन केले होते. ‘जसं मला सांभाळलं, तसं माझ्या उद्धवला व आदित्यला सांभाळा’, हे बाळासाहेबांचे शब्द मालेगावात लावलेल्या बॅनरवर झळकत आहेत. या माध्यमातून ठाकरे गटाने भावनिक आवाहन केले आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. या बॅनरवर प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ते बाळासाहेब ठाकरे ,उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य स्थानिक पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत.