पंतप्रधानांच्या बहीण, शिंदे गटाच्या खा. भावना गवळींना घेरण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा मेगा प्लॅन तयार..

वाशिम : (Uddhav Thackeray On Bhawana Gawali) अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारील देशभरातील सर्वच राजकीय पक्ष सध्या तयारीला लागले आहेत. त्यासाठी अनेक पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची चाचपणी करण्यात येत आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागा असून देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठं राज्य आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनं शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिंदे गटात सामील झालेल्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मोठा प्लॅन केला आहे.
दरम्यान, त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भावना गवळी यांना शह देण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. यासाठी माजी मंत्री संजय देशमुख यांनी तयारी सुरू केली असून येत्या ११ तारखेला त्यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळमध्ये कार्यकर्ता हुंकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या अनुषंगाने आज वाशिममध्ये पदाधिकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी शिवसैनिकांना मेळाव्यालाही उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
भावना गवळी यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याची ठाकरे गटाची तयारी सुरू आहे. त्यासाठी माजी मंत्री संजय देशमुख व पोहरादेवी गडाचे महंत सुनील महाराज लढतीसाठी इच्छुक आहेत. देशमुखांनी तर जोरदार तयारी सुरू केली आहे. संजय देशमुख हे दिग्रस विधानसभेचे आमदार होते. तसेच २००२ ते २००४ या काळात ते मंत्रीही राहिले आहेत. सुरुवातीला देशमुख हे संजय राठोड यांच्याविरोधात निवडणूक लढतील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र त्यांनी दिग्रसच्या बाहेर पडून बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. अगदी वाशिममध्ये येऊन त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.
जिल्ह्यातील बंजारा समाजाचे महत्वाचे नेते व पोहरादेवी गडाचे महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा निर्णय घेऊन पक्षप्रवेश केला होता. आता ते लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. मतदारसंघात बंजारा समाजाचे प्राबल्य पाहता येथून बंजारा उमेदवार दिल्यास भावना गावळींचा पराभव करणे शक्य आहे, असा कयास त्यांच्या समर्थकांकडून लावला जात आहे. संजय देशमुखांच्या तयारीविषयी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता सुनील महाराज म्हणाले, ‘आम्ही दोघेही पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. निवडणुकीला अजून वेळ आहे. मात्र उद्धव ठाकरे ज्यांना उमेदवारी देतील, त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू आणि उमेदवाराला निवडून आणू. उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास मीही लढण्यास तयार आहे. सर्व समाजातील लोक माझ्याबरोबर आहेत.’