मुंबई इंडियन्स संघावर मधमाशांचा हल्ला; खेळाडूंनी घातले लोटांगण

मुंबई : मुंबई इंडियन्स संघाच्या मागची साडेसाती काही केल्या हटायला मार्ग नाही. मुंबई संघाला आयपीएलच्या यंदाच्या हंगामात एकही सामना अजूनही जिंकता आलेला नाही. त्यांना सलग सहा सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दर सामन्यावेळी काही ना काही कारणाने संघाला खराब कामगिरीचा फटका बसतो आहे. या सगळ्या गोष्टींमुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत सर्वात खाली आहे. पण या सगळ्या संकटात अडकले असताना मुंबईच्या संघावर नैसर्गिक संकटांचा सामना सुद्धा करण्याची वेळ आली आहे. सराव सामन्यादरम्यान मैदानावर मधमाशांनी हल्ला केला. सुदैवाने यामध्ये कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली नाही.
खेळाडू मैदानावर सराव करीत होते. यावेळी मैदानावर अचानकपणे मधमाशांनी एकप्रकारे आक्रमणच केले. पाहता पाहता मैदानावरील वातावरणात सर्वत्र मधमाशाच दिसू लागल्या. या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी खेळाडूंना सर्व काही सोडून सरळ मैदानावर लोटांगण घालावे लागले. मधमाशांपासून बचावासाठी सर्व खेळाडू मैदानावर झोपल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेचा व्हिडीओ मुंबई इंडियन्स संघाच्या विविध सोशल माध्यमांवर शेअर करण्यात आला आहे.
यावेळी ‘टू बी ऑर नॉट टू बी’ अशी सुंदर कॅप्शन देखील देण्यात आली आहे. या नैसर्गिक संकटातून तर मुंबई इंडियन्सचा संघ सुखरूप बचावला आहे. पण संघावर जी पराभवाची नामुष्कीचेे सतत संकट ओढवत आहे, त्यातून संघ केव्हा बाहेर पडणार याची चिंता मुंबईच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स हा संघ सर्वाधिक यशस्वी व नेहमी वर्चस्व राखणारा ठरला आहे. मुंबईच्या संघाने तब्बल ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.