“उर्दू भाषा ही पाकिस्तानची नसून हिंदुस्थानचीच”, जावेद अख्तर यांनी मांडली स्पष्ट भूमिका
मुंबई | Javed Akhtar – ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनाच खडे बोल सुनावले होते. त्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात होतं. तसंच आता जावेद अख्तर त्यांच्या नवीन वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.
जावेद अख्तर यांनी पत्नी शबाना आझमीसह ‘शायराना – सरताज’ नावाचा उर्दू (Urdu) गीतांचा अल्बम लाँच केला आहे. यावेळी त्यांनी उर्दू भाषेचं महत्त्व आणि तिच्या वाढीसाठी पंजाबनं बजावलेली भूमिका यावर स्पष्ट भूमिका मांडली. उर्दू ही भाषा पाकिस्तानची किंवा इजिप्तची नाही, तर ती हिंदुस्थानची भाषा आहे, असं ते या कार्यक्रमात म्हणाले.
यावेळी जावेद अख्तर म्हणाले की, “उर्दू भाषा ही इतर कोणत्याही ठिकाणाहून आलेली नसून ती आपली स्वतःची भाषा आहे. उर्दू भाषा हिंदुस्थानाबाहेर बोलली जात नाही. पाकिस्तान भारतापासून फाळणीनंतर अस्तित्वात आला, त्यापूर्वी तो भारताचाच भाग होता. त्यामुळे उर्दू भाषा हिंदुस्थानाबाहेर बोलली जात नाही.”
“पंजाबचं उर्दू भाषा वाढवण्यात मोठं योगदान असून ती भारताचीच भाषा आहे! पण ही भाषा आपण का सोडली? फाळणीमुळे? कि पाकिस्तानमुळे? खरं तर आपण उर्दू भाषेकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. पूर्वी फक्त हिंदुस्थान होता, फाळणीनंतर पाकिस्तान हिंदुस्थानपासून वेगळा झाला. उर्दू भाषा ही हिंदुस्थानी भाषा आहे. मात्र, आजकाल आपल्या देशात नवीन पिढीचे तरुण उर्दू, हिंदी कमी अ्न इंग्रजी जास्त बोलतात. पण आपण हिंदीत बोललं पाहिजे कारण ती आपली राष्ट्रभाषा आहे,” असंही जावेद अख्तर म्हणाले.