लग्नात ताशा वाजवून पोट भरणाऱ्या 95 वर्षांच्या आजोबांना उर्फीची आर्थिक मदत

मुंबई | अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. सतत काहीना काही पोस्ट करून ती चर्चेत राहत असते. उर्फी तिच्या हटके फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. मात्र, यावेळी उर्फीच्या एका कृतीने तिने चाहत्यांचं मन जिंकून घेतलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ पाहून उर्फी त्या व्यक्तीच्या मदतीला धावून गेल्याचं समोर आलं आहे.
काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एक ९५ वर्षीय आजोबा आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी लग्नात ताशा वाजत होते, हा व्हिडिओ उर्फीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला. हा व्हिडिओ पाहून उर्फी सुन्न झाली होती. तिने तातडीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट करत असे लिहिले की, ‘कोणाकडे यांचा नंबर किंवा पत्ता असेल तर पाठवा’.

हा व्हिडिओ एका इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आलेला. ते पेज हँडल करणाऱ्या व्यक्तीशी उर्फीने संपर्क साधला आणि त्यांच्या मदतीने तिने त्या आजोबांशी संपर्क साधला. उर्फीने त्यांना तातडीने काही पैशांची मदत केली आणि दर महिन्याला थोडेफार पैसे नियमित देणार असल्याचेही उर्फीने सांगितले. अभिनेत्रीने अलीकडेच तिला या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणाऱ्या पांडे या व्यक्तीचे आभार मानणारी पोस्टही इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे.