पावसाळा का हिवाळा, मॅटसाठी नको कंटाळा
सीझन कोणताही असला तरी मॅट जागेला वेगळा लूक देतात. पावसाळ्यात पाण्याचा ओलावा आणि इतर ऋतूंमध्ये धूळ पसरायला प्रतिबंध करतात. त्यामुळे मॅट वापरणे आवश्यक ठरते. मॅट आता घरात, कार्यालयात अगदी हॉटेल आणि विश्रामगृहात, सगळीकडे दिसू लागली आहे. त्यांचे वापरदेखील विविध आहेत. कोणी घरात बाहेरील घाण न येण्यासाठी ते वापरते, तर कोणी सुशोभीकरणासाठी वापरते. त्यांच्या वापरानुसार त्यांचे विविध प्रकार देखील पडतात.
स्वागतासाठी मॅट
वेलकम मॅट हे प्रवेशद्वारात ठेवण्याची पद्धत आहे. त्यामागे बाहेरील धूळ-माती घरात येऊ नये, असा हेतू असतो. शिवाय येणाऱ्या माणसाचे पहिले पाऊल तिथेच पडते. शक्यतो हे मॅट आकाराने मोठे आणि जाड असतात. हे मॅट टिकाऊ असतात, कारण ते जास्त प्रमाणात वापरले जाणार असल्याने त्यांची घडवणूक तशी केलेली असते. रबर, ज्यूट, काथ्या किंवा जाड धाग्यांपासून हे तयार केले जातात. अनेकदा यावर कंपन्या आदींचे ब्रॅंडिंग करण्यासाठीही डिझाइन केले जाते.
किचन मॅट
किचनमध्ये काम करताना पाय घसरून पडू नये, यासाठी हे विशेष मॅट तयार केले गेले आहेत. यांचा वापर शक्यतो किचनमध्येच करावा. कारण हे मॅट जाळीदार असतात आणि ते घसरायला प्रतिबंध करणारे (अॅन्टी स्लीप) देखील असतात. रबर किंवा धाग्यांपासून हे मॅट तयार केलेले असतात. या मॅटची जडण अशी तयार केलेली असते की स्वयंपाक घरातला कोणताही डाग पडल्यास तो लगेच धुवून निघू शकतो.
न विस्तारणारे मॅट
हे मॅट अशा लोकांसाठी तयार केले आहेत किंवा अशा ठिकाणी बसविले जातात, जेथे लोक जास्त काळ उभे राहणार आहेत. जसे की कार्यालये किंवा रिटेल स्टोअर्समध्ये हे मॅट वापरले जातात. ज्यावर सतत माणसे उभी राहिलेली असतात. हे मॅट शक्यतो रबरीअसतात. हे तुलनेने जाड आणि जड असतात.
बाथरूम मॅट
बाथरूम किंवा ओल असलेल्या ठिकाणी वापरण्यासाठी हे विशेष मॅट तयार केलेले असतात. रबर किंवा जाड शीट्सपासून तयार केलेले हे मॅट जाळीदार असतात. शिवाय यावरून पाय घसरून पडण्याचा धोका देखील कमी असतो.
स्टेअर मॅट
सहसा जिन्यावर टाकण्यासाठी या मॅटची विशेष घडवणूक केलेली असते. जिना चढताना अगर उतरताना पाय घसरून पडण्याचा धोका अधिक असतो. अशा वेळी, पावलांना ग्रीप येण्यासाठी, तोल सावरण्यासाठी या मॅटचा मोठा उपयोग होतो.
कार मॅट
आपण ज्यावेळी कारने प्रवास करतो. त्यावेळी आपल्या बुटांची धूळ कारच्या खालच्या भागाला लागून कार कायमस्वरूपी खराब होऊ नये, यासाठी या मॅटचा वापर करतात. कारण एका ठरावीक कालावधीने हे काढून धुता येतात. त्यामुळे पर्यायाने गाडी कमी खराब होते.
इंटिरिअर मॅट
हे मॅट सहसा सुशोभीकरणासाठी असतात. हे घराच्या कोपऱ्यात किंवा खोलीच्या मध्यभागी लावलेले असतात. या मॅटची रंगसंगती टाइल्ससोबत जुळवली जाते. यावरून जमीन खुलून दिसते. तसेच घरात एक अाल्हाददायक वातावरण निर्मिती होते. शिवाय यांची नियमित साफसफाई केल्याने लहान मुले देखील यावर खेळू शकतात.
अॅन्टी स्लीप मॅट
हे मॅट सरळ नसून ओबडधोबड किंवा खडबडीत असतात. यांच्यावरून घसरून पडण्याची शक्यता जास्त नसते. पावसाळ्याच्या काळात या मॅटला सर्वाधिक मागणी असते आणि अनेक हॉटेलमध्ये या मॅटचा वापर केलेला असतो.