ओरिगामीचे विविध आकर्षक प्रकार
ओरिगामी ही कागदांना घडी घालून वेगवेगळ्या रचना करण्याची कला आशियामधून पुढे आली. साध्या ओरिगामीने पुढे अनेक प्रकारचे रूप घेतले. त्याविषयी…
ओरिगामी ही कागदांना घडी घालून विविध आकर्षक आकार तयार करण्याची कला चीन आणि जपानमधून पुढे विकसित झाली. तिच्या साधेपणाने जगभरातल्या कलाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. तिचा प्रचार प्रसार झपाट्याने झाला. तसे त्यात वेगवेगळे प्रकार पुढे येऊ लागले. एकापेक्षा जास्त कागद एकत्र जोडून मॉड्युलर ओरिगामी हा प्रकार पुढे आला.
थ्रीडी ओरिगामी
मॉड्युलरचा पुढचा प्रकार म्हणजे थ्रीडी ओरिगामी. यात चेंडूसारख्या गोलाकार वस्तू, तारे, डबे, अशा सुंदर शोभिवंत वस्तू तयार होतात. या प्रकारात अनेक त्रिकोणी प्रकार एकमेकांत खोचून विविध आकाराचे पक्षी, फुले, मासे, प्राणी तयार केले जातात. ते अगदी हुबेहूब दिसतात. त्यामुळे त्यांना थ्रीडी म्हटले जाते.
जवळजवळ तिसऱ्या शतकात चीनमध्ये कागदाचा शोध लागला. त्यानंतर चीनने विरंगुळा म्हणून ही कला जन्माला घातली असेही काहींचे मत आहे. पुढे जपानी लोकदेखील या कलेच्या प्रेमात पडले. नंतर चीनच्या तुलनेत जपानमध्ये ही कला खऱ्या अर्थाने विकसित झाली. सुरुवातीच्या काळात कागद हा महाग असल्याने ही कला फक्त श्रीमंतांची मक्तेदारी झाली. नंतर कागदाचे उत्पादन वाढले आणि तो सर्वांसाठी उपलब्ध झाल्यावर ही कला वृद्धिंगत झाली.
अवकाश विज्ञानात सोलर पॅनल्ससाठी ओरिगामीच्या घडी घालण्याच्या आणि उलगडण्याच्या तत्त्वाचा वापर केला जातो. अमेरिकेच्या नासा या संस्थेसाठी काम केलेले रोबर्ट लँग हे ओरिगामी तज्ज्ञ म्हणून जगात नावाजले गेले आहेत.
ओरिगामीचे मानसिक लाभ
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ओरिगामीचे अनेक फायदे होतात, असे सिद्ध झाले आहे. ओरिगामीमुळे मन एकाग्र व्हायला मदत मिळते. मनोरुग्ण, व्यसनाधीन व्यक्ती यांना मानसिक स्थैर्य मिळवायला देखील ही कला मदत करते. ही कला करताना दोन्ही हातांच्या बोटांचा वापर होत असल्याने मेंदूचा उजवा भाग कार्यरत राहतो. मेंदूचा उजवा भाग हा कल्पकता, सर्जनशीलता, नवनिर्मिती, भावनिक प्रगल्भता यांच्याशी निगडित असतो. त्यामुळे विस्मृती संबंधित रोग दूर राहतात