पुणेसिटी अपडेट्स

जिल्ह्यातील २६ धरणांचा पाणीसाठा चिंतेचा विषय

ढगाळ वातावरणामुळे बाष्पीभवन घटले

चालू वर्षी मान्सून लवकर दाखल होईल, अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येते. या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी सध्या धरणांमध्ये असलेला कमी पाणीसाठा लक्षात घेऊन पाण्याचे योग्य नियोजन करणे तितकेच गरजेचे आहे. जेणेकरून जोपर्यंत यंदाच्या पावसाळ्यात धरणांमध्ये पावसाचे पाणी साठवून पाणीसाठा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत पाण्याचा शेतकर्‍यांनी काटकसरीने वापर करावा.
प्रशांत कडुसकर, अभियंता, कुकडी प्रकल्प

रांजणी : पुणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीदेखील कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे साहजिकच धरणातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन घटले असून त्यामुळे धरणातील पाणीसाठा स्थिर आहे. दरम्यान, उन्हाचा पारा वाढल्याने धरणातील पाण्याची मागणी मात्र वाढली होती. अशातच धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होऊ लागला होता. मात्र ढगाळ वातावरण झाल्याने आता धरणातील पाणीपातळी स्थिर झाली आहे.

जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये सुमारे ३०.३४ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात उजनी धरणात लहान-मोठी अशी एकूण २५ धरणे आहेत. त्यातील उपयुक्त पाणीसाठा क्षमता २१६.२५ टीएमसी आहे. या पाण्याचा वापर शेतीसाठी, तसेच पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांना पिण्यासाठी आणि सिंचनासाठी होतो. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अतिउष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढली होती. सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. चालू महिन्यात वेळेवर पाऊस झाला नाही तर या धरणातील पाणीसाठा आणखी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जात असल्याने बहुतांश पाणी शिल्लक आहे.

दरम्यान, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात असलेला कुकडी प्रकल्पदेखील तितकाच महत्त्वाचा असून या प्रकल्पातदेखील आता अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत असणार्‍या डिंभे, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगा आणि येडगाव या धरणांमध्ये साधारणतः ऑगस्ट महिन्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा निर्माण होतो, त्यामुळे या धरणातील पाण्यावर अवलंबून असणार्‍या शेतकर्‍यांना आता पाण्याची टंचाई भासू लागली आहे. मात्र यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या डिंभे, घोड आणि वीर या धरणांमधून पाण्याच्या डाव्या कालव्यांना तर खडकवासला वीर उजनी धरणातून उजव्या कालव्यात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. पाण्याचा वापर शेतीसाठी केला जात असून याशिवाय खडकवासला धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे साहजिकच धरणातील पाणीपातळी कमी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये