
मुलांना घरचा अभ्यास द्यायचा की नाही, या प्रश्नात गुंतून राहिलेल्या शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण व्यवस्थेचाच गृहपाठ करण्याची जास्त आवश्यकता आहे. पाठीवर वह्या-पुस्तकांचे ओझे वागवत शेळ्या-मेंढ्या भरल्यासारख्या जाळीच्या रिक्षातून जात- येत रोज एका ‘तथाकथित प्रोजेक्ट’वर काम करणारे विद्यार्थी निव्वळ ‘स्पर्धक’ म्हणून रगडले जात आहेत.
आजी-आजोबांसोबतच्या गुजगोष्टींसोबत निसर्ग, नैतिक शिक्षण, सार्वजनिक व्यवस्था, बँकिंग अशा अनेक वास्तवदर्शी शिक्षणापासून शालेय विद्यार्थी बरेच दूर आहेत. वास्तवदर्शी शिक्षण व्यवस्था अमलात आणण्याचा’गृहपाठ’ करत ही पठडी बदलण्याची गरज आहे. मागील महिन्यात झालेल्या पर्यावरण दिनी पाच वर्षांचा अवनीश घरासमोरील बिया गोळा करत घरी आणत होता.
त्यानंतर त्याने वहीच्या कागदावर झाडाचे चित्र काढून त्यावर एक एक बी चिकटवली. हे पाहून मी विचारले, की हे नेमके काय आहे? तर त्याने सांगितले, उद्या क्लास टीचरने’इकोफ्रेंडली’ प्रोजेक्ट बनवायला सांगितलं आहे, त्यात त्यांनी झाडांच्या बिया कागदावर चिटकून आणायला सांगितलं, पण यातून नेमकं काय होणार, हे कशासाठी, यातून तुझ्या काय लक्षात आलं, त्याचं उत्तर मात्र त्याच्याकडे नव्हतं.
शाळेत सांगितलं ते करायचं. त्याला एक ‘मंथली प्रोजेक्ट’चं गोंडस नाव द्यायचं. त्यातून नेमका आपला विद्यार्थी घडतोय का? त्याला त्याच्या शैक्षणिक प्रवासात याचा नक्की उपयोग होतोय का? त्याचे जीवन अधिक सजग होण्यासाठी नेमका तो कोणता बोध घेतोय? याची कुठलीही शहानिशा या तथाकथित प्रोजेक्ट्समधून नाही.
गणित आणि इंग्रजीमध्ये चांगल्या मार्कांचा अट्टहास आणि केवळ ठरवलेल्या अजेंड्याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून सक्तीने करून घेतलेले प्रोजेक्ट ( जे बहुतांश त्यांचे पालकच करत असतात ) हेच सध्या शिक्षकांचे आणि बहुतांशी पालकांचे एकमेव ध्येय आहे. जणूकाही ‘अर्जुनाला फक्त माशाचा डोळाच दिसावा आणि त्याचाच छेद करण्यासाठी त्याने आपली सर्व शक्ती पणाला लावावी’ अशा पद्धतीने या दोन विषयांवरची प्रचंड अनामिक भीती आणि सक्ती या शिक्षण व्यवस्थेने सध्या विद्यार्थ्यांच्या डोईवर टाकली आहे.
आज कॉम्प्युटरचा प्रोजेक्ट, उद्या पर्यावरणाचा प्रोजेक्ट, परवा चित्रकलेचा प्रोजेक्ट असे अनेकविध प्रोजेक्ट दाखवत सीनिअर केजी ते सातवीच्या विद्यार्थ्यांपर्यंत या स्पर्धकांना अक्षरशः पळवले जात आहे. परंतु एक सक्षम, सुजाण नागरिक बनण्यासाठी रस्त्यावरच्या वाहतूक व्यवस्थेपासून ते बँकेचे बचत खाते उघडण्यापर्यंत जे वास्तवदर्शी शिक्षण गरजेचे आहे, त्याचा ‘गृहपाठ’ एकदा देऊन बघायला काय हरकत आहे?
गृहपाठ पाहिजे की नको, यावर सध्या विचारमंथन सुरू आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांचा गृहपाठच घ्यायचा नाही, अशी घोषणा करून टाकली. थोडासा गोंधळ झाल्यानंतर अनेक शिक्षण तज्ज्ञांच्या माध्यमातूनच हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगून टाकले. परंतु गृहपाठाच्या व्याख्या नेमक्या काय आहेत, याचा कुठेही सुस्पष्ट उल्लेख त्यांनी केला नाही. शाळेमध्ये शिकवलेले शिक्षण घरी गेल्यानंतर सराव म्हणून करावेच लागेल, त्याशिवाय ते विद्यार्थ्यांच्या लक्षात राहणार नाही हा साधा-सोपा नियम. परंतु हा इतका चर्चेचा आणि गरजेचा विषय आहे का?
शालेय शिक्षणामध्ये यापेक्षाही जास्त मोठे प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. पाश्चिमात्य देशांची कॉपी कॅट करत असताना शिक्षण व्यवस्थेचे अनेक नियम बनवले गेले. परंतु बदलत्या समाजमनाप्रमाणे ज्या पद्धतीने त्या देशांमध्ये हे बदल झाले ते बदलदेखील आपण स्वीकारले का?
पाढ्यांचे पाठांतर, अक्षर गिरवण्याची स्पर्धा, गणित आणि इंग्रजीमध्ये चांगल्याच मार्गाचा अट्टाहास, विज्ञान शाखेतील भविष्यातील प्रवेशासाठी इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, त्यासाठी घरात इंग्रजी कल्चर नसले, तरी मराठी शाळा सोडून इंग्रजी मीडिअममध्येच घालण्याचा अट्टहास, ९०पेक्षाच अधिक मार्क पाडण्याची आवश्यकता… या सगळ्या जंजाळामध्ये आपण कुठं तरी विद्यार्थ्यांचं बालमन कोमेजून टाकत आहोत का, याचाही अभ्यास केला पाहिजे.
या सर्वांपेक्षा निसर्गपूरक आणि पर्यावरणपूरक शिक्षण पद्धती जर आपण स्वीकारली, तर अनेक सामाजिक समस्यांना दूर सारणारी आणि सामाजिक पर्यावरण जागरूकता असलेली पिढी आपण बनवू शकत नाही का? आजी-आजोबांच्या गोष्टींमध्ये जो गृहपाठ सहजतेने होऊन जातो तो या सक्तीच्या, केवळ वह्या खरडण्याच्या सक्तीमधून होऊ शकतो का, याचाही विचार केला पाहिजे.
शाळा संपल्यानंतर घरी जाईपर्यंत कशा पद्धतीने चालावे, रस्ता ओलांडावा, सिग्नल पाळावे, रस्त्यावरची स्वच्छता ठेवावी यापासून ते अनेक गोष्टी पाश्चिमात्य अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत. किंबहुना तोच त्यांचा ‘गृहपाठ’ आहे. अशा पद्धतीचा एक व्यवहारशील व्यक्ती घडवणारा गृहपाठ आपण व्यवस्थेमध्ये आणू शकतो का?
त्या देशांपेक्षा देखील गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये भारताने खऱ्या अर्थाने दिवसभराच्या जीवनशैलीमध्येच ‘नैतिक मूल्यांपासून ते आयुष्यातील ध्येयनिश्चिती’पर्यंतचे अनेक गृहपाठ दिले आहेत. किंबहुना गृहपाठ हाच एक जीवन पद्धतीचा भाग सांगितला गेला आहे.
यामध्ये योगसाधना, प्राणायाम यापासून ते सकारात्मक विचार आणि त्यातून मिळणारी ऊर्जा याचा एक फार मोठा गर्भितार्थ दडला आहे. परंतु हे सगळे संस्कार, ही जीवनमूल्यं केवळ वह्या-पुस्तकांच्या आणि छापील वास्तवदर्शशून्य अभ्यासक्रमांच्या ओझ्याखाली आपण किती दूर फेकून दिली आहेत, याची जाणीव तरी आजच्या शिक्षणव्यवस्थेला आहे का?
घरचा अभ्यास म्हणजे घरी रोज करण्याचा अभ्यास. रोजची साधना. हा ज्या संस्कृतीचा मूळ गाभा आहे – त्यातच त्या दिवसाची सुरुवात सुदृढ आणि निरोगी मन राखू शकलेल्या, राखू शकणाऱ्या प्राणायाम आणि योगाने होते. आज त्याचे मोठे शिबिरे – कॅम्प – अभ्यासक्रमांच्या मोठ्या ‘कवायती’ कराव्या लागत आहेत. याची एवढी गरज आम्हाला का पडावी? कारण मुळातच साधनेचा हा ‘गृहपाठ’ आम्ही शालेय वयापासून विसरत चाललो.
जीवन सुंदर बनण्यासाठी जे घरी करायचे आहे त्याचे संस्कारदेखील शाळेतूनच दिले गेले पाहिजेत. कारण शाळा हीच नवीन शिकण्याचे – सृजनता आत्मसात करण्याचे केंद्र आहे. ही केंद्रे जेव्हा सक्षम होतील, तेव्हा गृहपाठासारख्या निरर्थक विषयांवरची बाष्कळ चर्चा करण्यापेक्षा मुलाला माणूस म्हणून घडवण्यासाठी जे करायचे तो घरचा अभ्यास कसा होईल, यावर लक्ष केंद्रित झाले पाहिजे.