राष्ट्रसंचार कनेक्टसंडे फिचरसंडे मॅटिनी

कौटुंबिक कलह टाळावेत

-विद्यावाचस्पती विद्यानंद

कौटुंबिक कलहांची सुरुवात आर्थिक कारणांमुळे होत असल्याचे अनेकदा समजते. विवाहानंतर उभयतांनी मिळवलेले आपापले उत्पन्न हे स्वतःसाठीसुद्धा न वापरता जोडीदाराने मिळवलेल्या पैशावर हक्क दाखवायचा, त्यातूनच खर्च करायचा आणि स्वकमाईतून मिळालेला पैसा शिल्लक ठेवायचा. ह्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी केवळ पैशाचीच गरज भासू लागते. आर्थिक पातळीवर माझे ते माझेच आहे, पण तुझेसुद्धा माझेच आहे, असा विचार करणारी व्यक्ती मानसिक पातळीवर मात्र तुझे-माझे करून मोकळे होताना दिसते.

एकाच कुटुंबात राहूनदेखील प्रत्येकाचा आर्थिक ताळेबंद मात्र स्वतंत्र तयार होतो. त्या ताळेबंदाला कोणतेही ताळतंत्र नसते, तो ज्याच्या त्याच्या टाळेबंद कपाटात सुरक्षित ठेवलेला असतो. एकाच घरात एकाच कुटुंबातील सदस्यांचे हे आर्थिक ताळेबंद, व्यवहार इतके कुटुंबातील इतर सदस्यांपासून सुरक्षित ठेवावे लागतात का? तसे करणे एकूणच कुटुंबीयांच्या परस्पर नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून योग्य वाटते का? अनेकदा नकारात्मक विचार, वर्तन आणि व्यवहारामुळे परस्परांमध्ये दुरावा निर्माण होत जातो, गैरसमज वाढत जातात, मतभेद व्हायला लागतात आणि कालांतराने परस्परांविषयी वैरभावना निर्माण होऊ लागते. ह्यामुळे घडत काहीच नाही, परंतु सर्वच पातळ्यांवर बिघडायला लागते.

विवाहित व्यक्ती एकमेकांपासून कायमस्वरूपी विभक्त होण्याकडे वळत आहेत. काही जण तर एका वर्षाच्या आतच वेगळे व्हायचा निर्णय घेऊ इच्छितात. काही जणांमध्ये अनेक वर्षांच्या सहजीवनानंतरही घटस्फोटाचे विचार मनांत यायला लागतात. अर्थात, प्रत्येकाची कारणे निरनिराळी असतीलही, पण एक-दोन अपत्ये असलेल्या व्यक्तीदेखील असा विचार जेव्हा करतात तेव्हा त्या दोघांनाही त्यांचीच अपत्ये आपत्ती वाटायला लागतात. त्यांच्या विभक्तीमुळे होणाऱ्या परिणामांची जाणीव न होणे हीच उणीव म्हणावी लागेल. एकमेकांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय येत असेल, तर ते नाते फार काळ चांगले टिकत नाही.

परस्परांच्या भावनांबद्दल नेहमी संवेदनशील राहणे आवश्यक असते. एखादी व्यक्तिगत मागणी पूर्ण झाली नसेल तर नाराज होण्यापेक्षा त्यामागचे कारण समजून घ्यावे, दुसऱ्याची बाजूदेखील लक्षांत घेणे आवश्यक असते. काही वेळा गैरसमजांमुळे अविश्वास निर्माण होत राहतो आणि जोडीदार आपली फसवणूक करतोय, असे हळूहळू वाटायला लागते, ते अधिक घातक असते. या नात्यामध्ये कायम गोडवा राहावा, असा जरी प्रयत्न असला तरीही, काही वेळा हे संबंध बिघडण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये