महाराष्ट्ररणधुमाळीराष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

प्रतिध्वनी ऐका

शरद पवार यांचे बीड येथील भाषण नक्की कोणत्या हेतूने केले होते हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. मात्र ते होणे अवघड आहे. आता विरोधकांवर टीकाटिप्पणी करणे याचा अर्थ आपणच आपल्या वक्तव्याचा प्रतिध्वनी ऐकणे असा असल्याने सर्वच पक्षांनी आपल्या भविष्यकालीन योजनांबद्दल आता मतदार कार्यकर्त्यांना सांगावे.

सध्या राज्यात ज्या प्रकारची राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे ती पाहता राजकीय नेते यांनी धडा किंवा शहाणपण शिकणे आवश्यक आहे. बरे नेते शहाणपण शिकत नसतील तर आता जनतेने किंवा मतदारांनी तरी शहाणपण शिकणे आवश्यक आहे. रात्री बारा वाजेपर्यंत बैठकीत सोबत असणारा पुतण्या सकाळी विरोधी पक्षाच्या नेत्यांबरोबर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो किंवा “आपण पक्ष सोडणार नाही हे स्टॅम्पपेपरवर लिहून देऊ का?” असा संतापून प्रश्न विचारणारा पुतण्या काकांना भुलवून किंवा त्यांच्याच सल्ल्याने विरोधकांबरोबर 45 आमदार सोबत घेऊन जातो.

अथवा शिवसेना, काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन करण्याची बोलणी सुरू असतानाच विरोधी भाजपशी सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू ठेवणे अशी दुहेरी भूमिका घेणाऱ्या मंडळींनी आता एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा भविष्यकाळात आम्ही जनतेसाठी काय करणार, आपला पक्ष एकसंध ठेवणार, कोणी दुसऱ्या पक्षात जाऊ नये अथवा दुसऱ्या पक्षातल्या कोणाला आम्ही आमच्या पक्षात घेणार नाही असे संस्कार करणार, बेरजेचे राजकारण या गोंडस नावाखाली विरोधकांशी हातमिळवणी करीत मतदारांशी अनैतिक वर्तन करणार नाही, याची तेलगीच्या नव्हे तर भारत सरकारच्या स्टॅम्पपेपरवर हमी द्यावी.

सत्ता मिळवणे, त्याचा स्वार्थासाठी वापर करणे आणि तपासी यंत्रणातून सुटका करून घेणे यासाठी कोणी राजकारण करू नये आणि केले तर जनतेने ते खपवून घेऊ नये. अर्थात मतदारांच्या हातात काहीच नसते. त्यांच्या प्रामाणिकपणावर डांबर फासले जाते. हे 2019 च्या निवडणुकीनंतर राजकारण्यांनी ज्या कोलांटउड्या मारल्या त्यावरून स्पष्ट होते. युतीविरुद्ध आघाडी अशी लढत झाल्यावर महाविकास आघाडी निर्माण होते, तर पुन्हा त्यात फूट पडून महायुती तयार होते हा प्रकार राजकीय पक्ष आम्ही मतदारांच्या मतांना किंमत देत नाही हे अधोरेखित करणारा आहे.

बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यात शरद पवार बोलले ते खरोखर मनापासून होते का, हा प्रश्नच आहे. त्यांची आजपर्यंतची कारकीर्द पाहता हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. उद्या पुन्हा एकदा अजित पवार शरण आले तर शरद पवार त्यांना माफ करणार नाहीत का? अजित पवार यांच्याबरोबर जे आमदार गेले त्यांनी शरद पवार यांना पक्षात घेण्याची विनंती केली तर त्यांचा पक्षात प्रवेश होणार नाही का? मुख्यमंत्रिपदासाठी सुप्रिया सुळे भाजपसोबत जाणार नाही हे तरी पक्के आहे का?

मुळात शरद पवार भाजपला मदत करणार नाहीत हे तरी नक्की आहे का? या सगळ्यांची त्यांनी उत्तरे दिली पाहिजेत आणि त्या उत्तरावर जनतेचा विश्वास बसला पाहिजे. शरद पवार यांच्या अंतर्मनात काँग्रेसबद्दल नसेल, पण गांधी घराण्याबद्दल नक्कीच अढी आहे. एका मोठ्या विस्तारित परिप्रेक्षक काँग्रेस विरोधात भाजपला मदत करण्याची भूमिका भविष्यात शरद पवार घेऊ शकतात. ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतले असेल त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवा, या आपल्याच वाक्याचा प्रतिध्वनी शरद पवार यांनीही ऐकला असेल.

आता सध्या असलेल्या बहुतेक मोठ्या पक्षांकडून शरद पवार यांनी काही ना काही घेतले आहे आणि माणुसकीच्या नात्याने त्यांनी त्यांच्याबरोबर शहकाटशहाचे राजकारणही केले आहे . पाठीत खंजिराचे उदाहरण त्यांच्या कृतीवरूनच रूढ झाले आहे. तेव्हा काँग्रेस व शिवसेनेच्या पाठीवर वार करत शरद पवार भाजपला माणुसकीच्या नात्याने नक्कीच मदत करू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसची ही धडपड स्वतःला वाचवण्यासाठी आहे. यात कोणी शरण जाऊन, तर कोणी विरोधात असल्याचे वरकरणी दाखवत आपली चामडी वाचवत आहे . जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील हे रडारवर आहेत. त्यांनी केलेल्या भाजप विरोधात किती दम आणि प्रामाणिकपणा आहे हे त्यांनीच त्यांच्या भाषणाचा प्रतिध्वनी ऐकून तपासावे व प्रामाणिकपणे उत्तर द्यावे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये