महाराष्ट्रसंपादकीयहिस्टाॅरिकल

‘हर घर शिवचरित्र’ क्रांतिकारी उपक्रम

माऊली ज्ञानोबा, तुकोबांनी मराठी भाषेला परतत्त्वाचा स्पर्श दिला, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्तीचा स्रोत दिला! छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष आहे. सगळे शिवभक्त या निमित्ताने या युगप्रवर्तक घटनेचे आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण समाजपुरुषाला घडवीत आहेत.

शिवराज्याभिषेकाच्या ३०० व्या वर्षी स्थापन झालेले छत्रपती सेवा प्रतिष्ठान श्रीशिवराजाभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त “हर घर शिवचरित्र” अभियान राबवणार असून त्या अंतर्गत एक लक्ष घरी शककर्ते शिवराय हे द्विखंडात्मक शिवचरित्र पोहोचवण्याचा संकल्प आहे. यासोबत दुर्मीळ असे छत्रपती संभाजी राजांच्या पराक्रमाचे आणि बलिदानाचे वर्णन असणारे, तेजस्वी, सर्व आक्षेपांना उत्तर देणारे, ‘राजा शंभू छत्रपती’ आणि मूळ महाभारतीय संहितेच्या आधारे लिहिलेले, अभ्यासपूर्ण कर्ण चरित्र ‘सूर्यपुत्र’ हे दोन ग्रंथ देखील उपलब्ध करण्यात येत आहेत. समाजाला जोडण्याचे कार्य करणारी, राष्ट्रीय चारित्र्य रुजविणारी ही ग्रंथसंपदा समाजातील सर्वच शिवभक्तांनी संग्रही ठेवावी अशीच आहे. हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे.

संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात मागणी असलेले हिंदी भाषेत भाषांतरित झालेले ‘शक निर्माता शिवराय’ या चरित्राचे लेखक आहेत मनाने समृद्ध असलेले शिवपूजक प्रतिभावंत आदरणीय श्री. विजयराव देशमुख, उपाख्य सद्गुरुदास ! त्यांनी स्वतः गरिबीचे चटके सोसत मनाची समृद्धी जोपासली आहे. २८ जानेवारी १९४२ साली अकोला जिल्ह्यातील गाडेगाव येथे एका शेतकरी कुटुंबात यांचा जन्म झाला. बालपण व शालेय जीवन संयुक्त परिवारात शेतीची कामे, हुतुतूचा खेळ, घोडेस्वारी यात गेले.

शाळेसाठी तेल्हारा या तालुक्याच्या गावी भावंडांसह एकटे राहावे लागले. या वयातच संत गजानन महाराज आणि शिवाजी महाराज यांचे वेड लागले. मनाची समृद्धीही याच वयात दिसू लागली. छत्रपती शिवाजी महाराज यांची ओढ पूर्ण करण्याचे त्यावेळचे ग्रामीण भागातील साधन म्हणजे सिनेमा ! भालजी पेंढारकरांचे सिनेमे खाऊचे पैसे वाचवून बघत असत ! पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी खामगाव येथे आलेत. शिवकार्याचा ध्यास लागला होता, त्यातूनच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्यानमाला आयोजित केली. अनेक विद्यार्थी मित्रांसह शिवराज्याभिषेक पर्व याच व्याख्यानमालेत नाट्य रूपाने सादर करून आपले वेगळेपण दाखवून दिले.

परिस्थितीवश नागपुरात नोकरी स्वीकारावी लागली. तेथील हिंदू धर्म संस्कृती मंदिरात महाभारताचा अभ्यास सुरू झाला. वक्तृत्व कला अंगी होतीच. महाभारतातील युद्धाच्या निर्वाणीच्या प्रसंगी सूर्यपुत्र कर्णाचे रथचक्र काढतानाच्या अश्रूंनी त्यांच्या संवेदनशील मनात घर केले. सूर्यपुत्र कर्ण यावर व्याख्यान देणे सुरू झाले. दत्तावतारी सत्पुरुष सद्गुरू विष्णुदास स्वामी महाराज यांनी या विचारांना तपस्येची जोड नकळत दिली. ‘स्वतंत्र चिंतन करून कर्ण मांडा, दुसऱ्यांचे मुद्दे घेऊ नका’ या त्यांच्या सूचनेनंतर झपाटल्यासारखे विजयरावांनी १०० वेळा महाभारत पुन्हा पुन्हा वाचले, अभ्यासले.

त्यातून साकारलेले त्यांच्या प्रासादिक प्रतिभेचे प्रथम पुष्प, ‘सूर्यपुत्र’..! ग्रंथ समाजाला जोडण्याचे कार्य करणारा हवा, तोडण्याचे नव्हे, हा महत्त्वपूर्ण धडा मिळाला. अनुसूय बुद्धीने संशोधन करणे का आवश्यक आहे, हा संस्कार हे कर्ण चरित्र देते. नियतीच्या हातचे बाहुले बनून, अभिमानाने शत्रुत्वाची घरे न बांधता, नियतीचा खेळ ओळखून सूर्यपुत्र पुन्हा सूर्य मंडळात विलीन झाला, मुक्त झाला, हे त्यांचे विवेचन मुळातूनच वाचावे असे आहे. या उपासनेने विजयरावांचे मन बळकट झाले, दानशूर कर्णाप्रमाणे समृद्ध झाले.

कर्ण चरित्रानंतर पुन्हा शिवचरित्राचा वेध उसळी मारू लागला. १९७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३०० व्या राजाभिषेक वर्षी, विजयराव शिवदुर्गदर्शन यात्रा घेऊन नागपूरहून निघालेत, ते ‘रायगडा नेईन गुढी’ या ओढीने ! सिंदखेड, देवगिरी, चाकण, सिंहगड, पुरंदर, पन्हाळा, विशाळगड, सिंधुदुर्ग आदी दुर्ग दर्शन करीत सर्व यात्रेकरू रायगडी आलेत. इथेच त्यांच्यातील अनावर ऊर्मीने शिवचरित्र लेखनाचा संकल्पोच्चार झाला ! रायगडाशी आणा-भाका झाल्यात, व्रतस्थ राहून शिवचिंतन करायचे, राजियांची शब्दपूजा बांधायची, असा निश्चय झाला ! आपले सद्भाग्य की हा भावपूर्ण क्षण आणि या यात्रेचा संपूर्ण वृत्तांत ‘महाराजांच्या मुलुखात’ या प्रवास वर्णनात शब्दबद्ध झालाय ! अवघ्या दुर्गांचा लालित्यपूर्ण शैलीतील इतिहास यातून कळतो. हे विजयरावांच्या दैवी प्रतिभेचे दुसरे पुष्प !

राजीयांचे मोठेपण सांगेन, हा रायगडाला दिलेला शब्द विजयरावांनी आजतागायत पाळला ! कधीही स्वतःचे मोठेपण सांगितले नाही, सवंग प्रसिद्धीसाठी लेखणी विकली नाही, राजकीय भूमिका घेतली नाही, पूर्वग्रह रहित, इतिहासातून जसे दिसतात तसेच शिवराय ‘शककर्ते शिवराय’ या ग्रंथातून मांडलेत! संदर्भ असतील तेच प्रसंग चरित्रात घेतलेत. प्रत्येक वाक्य अस्सल पुराव्यांसह लिहिले. त्यासाठी सर्व स्थळांच्या यात्रा केल्यात. दक्षिणेत वेल्लोर, जिंजी तंजावर पर्यंत फिरून स्थानिक इतिहास मंडळे, मंदिरातील शिलालेख, सरस्वती ग्रंथलयातील हस्तलिखिते तपासून मगच लेखन केले. संशोधनात्मक चरित्राचा मजबूत पाया घातला. जिथे आवश्यक तिथे सत्यनिष्ठ अनुमान काढून दोन्ही बाजू मांडून स्वतंत्र निष्कर्ष काढलेत.

मन, मेंदू आणि मनगट बळकट करणारे हे शिवचरित्र या तपस्येतून निर्माण झाले ! यासाठी आजवर एकही पैसा मानधन घेतलेले नाही, प्रसंगी बिनपगारी रजा काढून दिलेल्या मुदतीत म्हणजेच १९८० साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३०० व्या पुण्यतिथीला हा ग्रंथ रायगडी चांदीच्या पालखीत मिरवीत शिवरायांना अर्पण केला ! या बुद्धिनिष्ठ चरित्राने समस्त शिवभक्तांना दिलेल्या योगदानाबद्दल लिहायचे तर स्वतंत्र लेखच होईल, तरी महत्त्वाचे मुद्दे म्हणजे…

  1. जिजाऊ साहेबांची जन्मतिथी १२ जानेवारी ही ज्ञात झाली. 2. शिवजन्मतिथीचा वाद मिटला. 3. शिवसमर्थ भेटीची निश्चिती झाली. 4. लखुजी जाधवराव यांच्या कर्तृत्वाची योग्य दखल घेतली गेली. 5. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज आणि आचार्यश्रेष्ठ समर्थ रामदास स्वामी यांच्या कार्याचे क्रांतीसाठी अनुकूलता निर्माण करणारे योगदान आणि समन्वय समोर आला. 6. कुडाळ मोहिमेतील शिवाजी महाराजांचा उद्देश. ७. अफझलखानाशी अफाट बुद्धीने लढलेले मंत्रयुद्ध.

हे खंड एकमधील महत्त्वाचे मुद्दे
तद्वतच खंड २ मध्ये

  1. मुरारबाजी बलिदान तिथीची निश्चिती आणि महत्त्व, 2. नेताजी पालकर व महाराज यांचा कुटनीतिक डाव, 3. पुरंदरच्या तहातील वीस किल्ले, 4. आग्रा पर्वाचे प्रथमच राजस्थानी डिंगल भाषेतील पत्रानुसार केलेले आकलन., 5. सूर्यराव काकडे आणि रामाजी पांगेरा यांच्या पराक्रमाची उचित दखल
  2. राज्याभिषेक सिद्धता. 7. दक्षिण दिग्विजय, 8. शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे संभाव्य आजारपण. 9. महाराजांची प्रशासन, धर्म, अर्थ आणि संरक्षण व्यवस्था, न्याय व्यवस्था याचे विहंगावलोकन आजही उपयुक्त आहे.

आज या शिवचरित्राची उपयुक्तता म्हणजे हे कुठल्याही तात्कालिक हेतूने लिहिले नसल्याने राष्ट्रीय चारित्र्य निर्माणासाठी शाश्वत मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य या चरित्रात आहे. आज हेतुत: निर्माण करण्यात आलेले वाद आणि त्यामुळे बिघडलेला मेंदू ठिकाणावर आणणारे हे चरित्र आहे. ज्या ज्या वेळी प्रकृती विरुद्ध विकृती, स्वातंत्र्य विरुद्ध गुलामगिरी आणि निरपेक्ष धर्मनिष्ठा विरुद्ध विकृत धर्मांधता असा लढा असेल त्या त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या मूल्यांनी हा लढा जिंकण्यासाठी आवश्यक प्रेरणा प्रत्येकाला मिळत राहील, असे हे आश्वासक चरित्र आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श त्या वेळी सांगितला गेला, तोच आदर्श समोर ठेवून ज्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र औरंगजेबाशी सतत युद्धमान स्थितीत राहिला, त्या संभाजी महाराजांच्या मनगट बळकट करणाऱ्या चरित्राची गाथा म्हणजे ‘राजा शंभू छत्रपती’ १९८९ ला मुख्यमंत्री शरदराव पवार आणि संरक्षण मंत्री कृष्णचंद्र पंत यांच्या उपस्थितीत प्रकाशित झालेला आणि पुन्हा पुढील आवृत्तीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित होण्याचे भाग्य लाभलेला हा ग्रंथ म्हणजे राजमाता सुमित्रा राजे भोसले यांच्या आज्ञेवरून विजयरावांच्या प्रतिभेने निर्मिलेले एक तेजस्वी यज्ञकुंड!

अशा एकाच लेखकाच्या तीन ग्रंथांचे एकत्रित प्रकाशन पुण्यात एम. आय. टी. च्या डॉक्टर विश्वनाथ जी कराड यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे, हा एक दुर्मीळ आणि विलक्षण योग आहे. आता प्रतीक्षा आहे, ती मनाने समृद्ध असणाऱ्या शिवभक्तांची! अवघ्यांनी यावे आणि जीवन समृद्ध करणारी ही ग्रंथगंगा समाजात प्रवाहित करीत जावे!

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये