राक्षसांचा वध करण्याची वेळ आली, उद्धव ठाकरे कडाडले; नाशिकच्या सभेतून भाजपवर घणाघात
नाशिक : (Uddhav Thackeray Nashik Sabha) ठाकरे गटाने नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली. दार उघड बये दार उघड, अशी मोहीम ठाकरे गटाने हाती घेतली आहे. राक्षसांचा वध करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गोधंळ घालायचाय, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आमची सत्ता आली की तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही पहा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. भाजप भेकडांची पार्टी आहे, असे देखील ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राच्या भवानीला मी आज साद घालतोय, बये दार उघडं! ज्या ज्या वेळेला धर्मावर अधर्माच संकट आलं तेव्हा भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम आणि आमच्या भवानी मातेने वेगवेगळे अवतार धारण करून त्या राक्षसांचा वध केला आहे. तीच वेळ आता आली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आत्ता जिथे मंदिर आहे तिथे पर्णकुटी होती, भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाई तिथे राहिले होते. शुर्पणखेचे नाक आणि कान हे सुद्धा प्रभु श्रीरामचंद्राने इथेच कापले. त्यानंतर 14000 राक्षस प्रभु रामचंद्राला मारायला आले होते आणि आता जसं माझ्यासमोर भव्य रुप आहे तस प्रभू रामचंद्राने अति भव्य तारक स्वरुप धारण करुन राक्षसाचा वध केला होता. काळ स्वरुप काळा राम माझ्या समोर आज उभा आहे, असे ठाकरे म्हणाले.
सत्ताधाऱ्यांची इथपर्यंत मजल गेली की शिवसेनेच योगदान काय? ते हे समोर बसले आहे. त्या वेळेला जेव्हा सगळे पळाले होते तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी जर जबाबदारी घेतली नसती तर?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
आता तर काही असे बिनडोक लोक म्हणत आहेत की शंकराचार्यांचे योगदान काय हिंदू धर्मामध्ये? मला भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारायचायं, जरा कोणी काही सनातन धर्माबद्दल बोललं तर तुमची तळपायाची आग मस्तकात जाते. जर सनातन धर्म तुम्ही मानत असाल तर तुमच्या पक्षात जे बाजारबुणगे आयाराम बनले आहेत भ्रष्टाचारी…हे सगळे घोटाळेबाज भ्रष्टाचारी तुम्ही पक्षात घेतले, मग मी असे म्हणू का की, भारतीय जनता पक्षात आज भ्रष्टाचार्यांना मान आहे पण शंकराचार्यांना नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही रात्रीबेरात्री भ्रष्टाचार्यांना हुडी घालून भेटतायं, त्यांना मोठीमोठी पद देताय… प्रफुल पटेलांसोबत तुमचे फोटो येत आहेत. देशद्रोही इकबाल मिर्चीसोबत त्यांनी व्यवहार केला म्हणून बोंबलणारे तुम्हीच होता. आपल्याकडे देखील होते, घाबरुन पळाले, खोक्यात बंद झाले. शिवसेनाप्रमुख आपल्याला शिकवून गेले शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. ज्यांना शेळी व्हायचंय त्यांनी मिंध्यांकडे निघून जा.
राममंदिर बनवण्यासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता. काश्मीरमधील 370 कलम काढून टाकण्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता. हिंदुंवर अत्याचार होत असताना सुद्धा हिंदुंच रक्षण होण्यासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता. पण जेव्हा कठीण काळ होता तेव्हा शिवसेनेची सोबत तुम्हाला लागली, अटलबिहारी वाजपेयी जेव्हा यांना केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा तुम्हाला शिवसेनाप्रमुखांनी मदत केली, ती शिवसेना आज तुम्ही संपवायला निघालात? हे तुमचं हिंदुत्व?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला.
स्वत: कडेकोट बंदोबस्तात रहायचं, पोलीस निमलष्करी, लष्करी, बाँब जॅमर लावून तुम्ही छप्पन्न इंचाची छाती दाखवता? अरे माझ्या शेतकर्याची हडकुळी छाती तुम्हांला भारी पडणार आहे, असे ठाकरे म्हणाले.