बिहारच्या सत्तासंघर्षाला महाराष्ट्राची किनार; विनोद तावडे पाटण्याला रवाना; म्हणाले…
पाटणा : (Bihar Political News) बिहारच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप आला आहे. त्याचे कारण म्हणजे, इंडिया आघाडीतील मोठे नेते आणि सध्या बिहारचे मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमारांनी जेडीयूसोबतचा संसार अर्ध्यावर सोडून भाजपशी गाठ बांधायचे निश्चित केले आहे. या सर्वांमध्ये महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे यांच्यावर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी मोठी जबाबदारी सोपावली आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणाला महाराष्ट्राची किनार मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
दरम्यान, आजचा दिवस हा बिहारच्या राजकारणाला कलाटणी देणार ठरणार आहे. महाराष्ट्राचे नेते आणि सध्या भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे तडकाफडकी पाटण्यात पोहोचले आहेत. विनोद तावडेंनी अनेक राज्यांमध्ये भाजपला यश मिळवून दिलेलं आहे. त्यांच्याकडे बिहारच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. ते दोन दिवसांसाठी पाटण्यात येणार असल्याचं शुक्रवारी स्पष्ट झालं होतं.
तावडे पाटण्यात दाखल झाले असता, यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं. फक्त एका वाक्यात विषय संपवला. बिहारमधल्या सध्याच्या घडामोडीवर माध्यम प्रतिनिधींनी त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, आज आम्ही राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही चर्चा करणार आहोत. असं म्हणून त्यांनी काढता पाय घेतला.