मी असो नसो, आंदोलन सुरूच ठेवा! मनोज जरांगेंची समाजाला भावनिक साद..
अहमदनगर : (Manoj Jarange Maratha Reservation) मागील काही महिन्यांपासून मराठा समाजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावेळी मात्र, समाज अधिक आक्रमक झालेला दिसत आहे. दरम्यान बोलताना आंदोलककर्ते मनोज जरांगे म्हणाले, ५४ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. त्यांना अगोदर कुणबी प्रमाणपत्र द्या, त्यानंतर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र मिळायलाच हवे. ‘सरसकट आरक्षणावर’ आम्ही ठाम आहोत, मी असो वा नसो, आंदोलन सुरूच ठेवा, असे आवाहन त्यांनी अहमदनगरमध्ये सभेत समाजाला केले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नाचा मुद्दा घेऊन, लाखोंचा जनसमुदाय पायी मुंबईकडे निघालेला आहे. अहमदनगरमध्ये (बाराबाभळी) आंदोलकांचे जंगी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, तसेच जेसीबीतून पुष्पवृष्टी करीत जरांगे पाटलांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, की मराठ्यांना मानावे लागेल. मोठ्या संख्येने मराठा समाज एक झाला आहे. मराठा कधी एक होत नाहीत, असा टोमणा मारला जात होता. पण मराठा एक झाला आणि त्याने ओबीसीतून आरक्षणही घेतले आहे. मराठा एक होऊ नये, यासाठी अनेकजण देव पाण्यात ठेवून बसले होते. पण पाठबळ कसे उभे करायचे हे मराठ्यांनी दाखवून दिले आहे.
ही एकजूच तुटू देऊ नका, असे आवाहन जरांगे यांनी केले. मी सरकारला मॅनेज होत नाही व फुटतही नाही, हीच सरकारची मोठी अडचण आहे. सात महिन्यांचा वेळ दिला, तरी निर्णय नाही. सरकारने काही दगाफटका केला तरी हे आंदोलन सुरूच राहणार आहे. आतापर्यंत ५४ लाख कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र द्या व सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्या, अशी मागणी जरांगे यांनी केली.