राष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

रिमझिम श्रावण

घन ओथंबून येती, बनांत राघू भिरती…

श्रावण महिना म्हटलं की, खुललेला निसर्ग, शांत वातावरण, राऊळी, मंदिरी शिवभक्तीचा महिमा ऐकू येतो. धार्मिक कार्याचा व व्रतवैकल्याचा हा मास घरोघरी साजरा होतो. श्रावण महिन्यात कुणाला धार्मिक कार्यात गोडी असते, तर काहींना निसर्ग खुणावत असतो. निसर्ग अगदी नयनरम्य झालेला असतो. कवी मनाला साद घालत निसर्ग आपले कौतुक करवून घेत असतो. या आनंदयात्रेतील पाऊस, सप्तरंगी इंद्रधनू, ऊन पावसाचा खेळ, खळखळ वाहणारे झरे, झुळझुळ वाहणारा वारा, हिरवा शालू घेऊन नटलेली धरतीमाता, असा निसर्गदत्त सौंदर्याचा आविष्कार म्हणजे श्रावण ! रिमझिम पावसाची ओढ ही सर्वांनाच लागलेली असते.

सृजनतेचा आविष्कार अंगिकारलेला श्रावण महिना आणि कवी मन यांचे अनोखेपण जाणवते. अनेक नव्या जुन्या कवींना, साहित्यिकांना मोहून टाकणारा हा महिना आहे. श्रावण आला की, निश्चितच बालकवींच्या कवितेची आठवण येते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे .

बालकवींनी श्रावण खूप सुंदर वर्णिला आहे. या महिन्याला हर्ष देणारा, आनंद वाटणारा महिना म्हटले आहे. क्षणाक्षणाला येणारे शिरवे आणि क्षणात पडणारे ऊन, हा खेळ पाहायला फार मज्जा वाटते. इंद्रधनूचा गोफ, आकाशी मंडपात बांधलेले तोरण, सूर्यास्तानंतर शिखर व घरांवर पडणारे सोनेरी ऊन, रानात रानवेलींना आलेली फुले, रानात बागडणारी हरणे असे अनेक मनमोहक वर्णन बालकवींनी केले आहे.

खिल्लारे ही चरती राणी गोपही गाणी गात फिरे
मंजुळ पाव गात त्याचा श्रावण महिमा एक सुरे

पूर्वी माळरान फुललेले असत. सर्वत्र हिरवळ असे पीक रानात डोलू लागत असे, अशा वेळी गोठ्यातील जनावरे रानात चरताना फारच सुंदर वाटे, त्यात गुराखी हा पावा वाजवत असेल तर रानात घुमणारी शीळ मनाला मोहून टाकत असते. आता हे चित्र मात्र कवी कल्पनेतच राहिले आहे. बालकवींच्या अनेक कविता या निसर्ग कविता असल्याने या कवितांतून निसर्गाशी फेरफटका मारल्याचा भास होतो. इतके या काव्यांत सामर्थ्य दडले आहे.

श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीमधारा
उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा कवी मंगेश पाडगावकरांना श्रावण कसा वाटतो त्यांनी ते या काव्यातून मांडले आहे. शेतकरी श्रावण महिन्यातील पावसाला देव पाऊस मानतो. कवी श्रावणात घन निळा बरसला असे वर्णन करतात. अंगावर पडणाऱ्या रिमझिम धारा या रेशमी धारा वाटतात. त्यातून हिरव्यागर्द झाडींचा मोरपिसारा अंगणात डोकावत असतो. राधाकृष्णाचे मिलन करणारा श्रावण ओळख सांगणारा वारा, पाचूचे माहेर, सोनेरी ऊन जणू हळदीचे वाटते. अशा मंगलमय वातावरणाने प्रफुल्लित झालेला निसर्ग, भिजलेल्या मातीच्या सुगंधाने सारा आसमंत व्यापून जातो. कविवर्य पाडगावकर आपल्या दुसऱ्या कवितेतूनही पाऊस मांडतात.

पाऊस आला रे आला की श्रावणात पावसाच्या धारा झेलू वाटतात. झाडी हिरवीगार झाल्यावर कोवळ्या पानाची हालचाल रुणझुण पैंजणा सारखी वाटते. त्याचा सुगंध, ओलावा अश्यात डोंगराला न्हावू घालणारा, रिमझिम होता होता हळव्या गंधाने पाऊस गाणं होऊन जातो.

हासरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला. कवी कुसुमाग्रजांना श्रावण महिना आल्हाददायक वातावरणाने हा श्रावण काहीसा हसरा, लाजरा सुंदर साजिरा तांबूस वातावरणात भिजवणारा वाटतो. आकाशात ऊन-पावसाच्या खेळात ढगांच्या आडून पसरणारी सोनेरी किरणे, हिरव्या रानांत पडताना जणू केशराचा शिडकाव होतो. इंद्रधनूची कमान, लपंडाव खेळत असा हा खेळकर श्रावण आनंदाचा धनी वाटतो. कारण हा श्रावण महिना म्हणजे एक आनंदोत्सव आहे. ते कुसुमाग्रजांनी अगदी अलौकिकपणे मांडले आहे.

गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा
पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा

अनेकांना श्रावण मनमोहक वाटतो. तर काहींना प्रियकराची आठवण करून देणारा वाटतो. असाच श्रावण कवी मधुकर जोशी यांनी मांडला आहे. आतुरता हा गीतातून विशद होते. श्रावणातील पावसाला प्रियेसी विनविते की असा बरस की प्रिया फिरून माघारी जाता कामा नये. झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात प्रियेविण उदास वाटे रात बरस बरस तू मेघा रिमझिम, आज यायचे माझे प्रियतम. श्रावण हा कवीमनाचा ठाव घेणारा, प्रेरणा देणारा महिना आहे. यात निसर्गाची विविध रूपे नजरेत भरतात.

असेच रानकवी ना. धों. महानोर यांना श्रावण खूप भावला आहे. ढग कसे ओथंबून गहिवरून येतात रान, वनांत राघू मुक्त संचार घेत असतात. हिरव्या झाडांतून पडणारा पाऊस, नदी सागराला जाऊन मिळते. डोंगरांवर हिरव्या गवतावरून फिरणारा वारा लाटा सारख्या वाटतात. पिकांत आता दाणे भरण्याची वेळ सुरू होत असताना पिकांत केशर भरल्यासारखे वाटते. असा हा पाऊस साजन होऊन बिलगतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये