अग्रलेखताज्या बातम्यापुणेसंपादकीयसिटी अपडेट्स

एमआयटीच्या कार्याला धर्माधिष्ठान देणारा पुरस्कार

पुण्यातील एमआयटीच्या वाढलेल्या व्यापक विस्तारामध्ये चाललेल्या कर्मयज्ञाला आजवर अनेक संतमहंतांचे, साधुसंतांचे आशीर्वाद मिळाले. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर सातासमुद्रापार याची ख्याती पोहोचली.

कलियुगामध्ये धर्मजागरण करणारा आणि अखंड धर्मचेतना जागविणारा महायज्ञ ज्या ठिकाणी सुरू आहे त्या मंत्रालयाच्या माध्यमातून उद्या एमआयटीचे डॉक्टर वि. दा. कराड यांना दिला जाणारा पुरस्कार हा खऱ्या अर्थाने त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याला आणि बहुतेक साम्राज्याला धर्माधिष्ठान देणारा पुरस्कार आहे.

राघवेंद्र गुरू सार्वभौमरू यांच्या कृपाशीर्वादाने आणि त्यांच्या चिरंतन अस्तित्वाने पावन झालेल्या या भूमीमध्ये राघवेंद्र स्वामी मठ मंत्रालय येथे सध्या ३५२ वा आराधना महोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने देशोदेशीचे दर्शनी तत्त्ववेत्ते संतमहंत आणि साधक यांचा महामेळा या ठिकाणी भरला आहे. यानिमित्ताने हा पुरस्कार परमपूज्य सुबुधेंद्र तीर्थ स्वामी यांच्या हस्ते प्राध्यापक वि. दा. कराड यांना दिला जाणार आहे.

एमआयटीच्या कोथरूड येथील विद्या दालनाचे आणि मंत्रालय आमच्या पवित्र नात्याचे अनुबंध फार जुने आहेत. ज्यावेळी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर सभागृहाचे बांधकाम सुरू होणार होते, त्यावेळी त्याकाळचे पीठाधीश परमपूज्य स्वामींनी या ठिकाणी भेट देऊन आपला अनुग्रह प्राध्यापक विश्वनाथ कराड यांना दिला होता आणि इतक्या मोठ्या सत्संकल्पाचा दाता नारायणाच्या रूपातून स्वामीजी अवतरले आणि त्यांनी आशीर्वाद दिला. त्यानंतर कधीच वि. दा. कराड यांनी मागे वळून पाहिले नाही. हिंदू धर्माच्या या एका नव्या चिरंतन आदर्शाचे मूर्तिमंत रूप उभे करीत असताना त्या पाठीमागे मंत्रालय पीठाचा आशीर्वाद आहे, ही अनुभूती त्यांना सातत्याने येत होती. स्वामींनी दिलेला प्रसाद अनुग्रहमाला या त्यांनी सातत्याने आपल्याजवळ धारण केल्या. हे कार्य उभे करीत असताना मंत्रालय पीठादिशाची कृपासिद्धी आपल्याला लाभली आहे याचा एक अपूर्व विश्वास त्यांना ठायी ठायी जाणवत होता. म्हणूनच हे काम एकट्या कराड यांचे राहिले नाही तर ते ब्रह्मकार्य झाले, असे ते नेहमी म्हणतात.

इतकं मोठं साम्राज्य उभं करणं, त्याला एका वैश्विक व अाध्यात्मिक अधिष्ठान देणं हे खरंतर एका माणसाचं काम नाही. याच्या पाठीमागे अद्वितीय शक्ती काम करीत असते आणि या शक्तीचा आशीर्वाद अनेकदा वि. दा. कराड यांना मिळाला आणि त्याची सुरुवात मंत्रालयाच्या पीठामार्फत झाली, याची त्यांना जाणीव आहे आणि म्हणूनच आज इतक्या वर्षांनंतर जेव्हा त्यांना मंत्रालयाचा पुरस्कार मिळाला, त्यामुळे जीवनातील एक वर्तुळ पूर्ण झाले असे मानावे लागेल.

दोन महिन्यांपूर्वी पंढरी संचारचे संपादक बाळासाहेब बडवे यांच्या रामायणावरील टीकेच्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्ताने परमपूज्य सुबोधेंद्र तीर्थ स्वामी हे एमआयटीच्या प्रांगणात आले होते. त्यावेळी त्यांनी आणि प्राध्यापक कराड यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. हे इतके मोठे धर्मकार्य उभे राहात असले तरीदेखील याला कर्तृत्ववान पुरुषाचा आशीर्वाद असतो आणि ती कर्तृत्व शक्ती आपण स्वतः उभी केली, असे गौरवोद्गार त्यावेळी स्वामीजींनी वि. दा. कराड यांच्याबद्दल काढले होते. त्याच कार्यक्रमामध्ये या पुरस्काराबद्दल स्वामीजींनी आपले पवित्र शब्द दिले आणि त्याची परिपूर्ती आज होत आहे.
प्राध्यापक वि. दा. कराड यांच्यासोबतच या भारतभूमीसाठी कार्यरत असणाऱ्या अन्य तीन महान विभूतींचा सत्कार होऊन त्यांनाही हा पुरस्कार दिला जात आहे.

श्री राम विठ्ठलाचार्य, तसेच नरसिंहराव आणि टाटा सन्सचे एन. चंद्रशेखरन यांना देखील या निमित्ताने पुरस्कृत केले जात आहे.
स्वामींचे निस्सीम भक्त आणि मुंबईच्या मंत्रालयात पीठाच्या शाखेचे कामकाज पाहणारे रामकृष्ण केरकर यांनी या सर्व अध्यात्माच्या अमृत गाठी जुळवून आणल्या. त्यांच्या पुढाकाराने स्वामीजींचा कृपाशीर्वाद या सर्व महान विभूतींना मिळत आहे.

आज मंत्रालयाच्या प्रांगणामध्ये होणारा हा पुरस्कार सोहळा खऱ्या अर्थाने लक्ष्मीच्या, सरस्वतीच्या सन्मानाचा, त्यांच्या पूजनाचा सोहळा आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने या विभूतींना पुरस्कृत करून केवळ त्यांच्या नव्हे तर त्यांच्या कार्याचा आणि हे सर्वजण ज्या क्षेत्रात काम करीत आहेत, त्या क्षेत्राचा गौरव होत आहे. त्यांना देण्यात येणारा पुरस्कार हा त्यांच्या प्रतिष्ठेच्या आणि वैभवाचा विषय असू शकतो, परंतु त्याहीपेक्षा त्यांच्याकडे बघून मार्गक्रमण करणाऱ्या त्यांच्या लाखो अनुयायांचा, विद्यार्थ्यांचा, कर्मचाऱ्यांचा एक प्रचंड प्रेरणास्रोत म्हणून हा पुरस्कार अनेकांच्या जीवनामध्ये नवी क्रांती करेल, प्रेरणेचा नवा स्रोत उत्पन्न करेल, यात संदेह नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये