ताज्या बातम्यामहाराष्ट्र

दरडी कोसळण्यास जबाबदार कोण?

रायगड | सध्या उत्तर भारतात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळणे व जमीन खचण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही सह्याद्री पर्वत रांगांमध्ये दरड कोसळण्याचं प्रमाणसुद्धा अधिक वाढलं आहे. यापूर्वी व गेल्या काही दिवसांत पुण्यातही अशा अनेक घटना घडल्या आहेत. नुकत्याच झालेल्या रायगडमधील इर्शाळवाडी (Irshalwadi) भागात दरड कोसळण्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. खरंतर पावसाळ्यात दरडी कोसळतात, हे नवीन नाही. मात्र, त्यावर पावसाळ्यापूर्वीच उपाययोजना केल्यास अशा घटनांना ब्रेक लागेल ही शक्यता नाकारता येत नाही. मग अशा वारंवार दरडी कोसळण्याच्या घटनेला सर्वस्वी जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होणं स्वाभाविकच आहे. अशा घटना व समस्या पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत.

रायगडमधील इर्शाळवाडी घटनेमुळे राज्य सरकार व स्थानिक प्रशासनसुद्धा पूर्णतः जागे झाले आहे. थोडक्यात सांगायचं तर पावसाळ्यात जमीन खचणे व रस्त्यावरील दरड कोसळणे अशा घटना सर्रास घडून येत असतात. मात्र, अशा घटना वारंवार घडू नयेत, यासाठी राज्य सरकार व स्थानिक प्रशासन काय उपाययोजना अमलात आणते, हे महत्त्वाचे असते. इर्शाळवाडी घटनेबरोबरच पुण्यातसुद्धा सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड घाट भागात दरड कोसळली होती. यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाकडून दीर्घकालीन उपाययोजना होणे गरजेचे आहे. या घाटरस्त्याचे रुंदीकरण करावे, दरड कोसळण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधावी, धोकादायक भागात पाण्याचा निचरा त्वरेने होण्यासाठी पावले उचलण्यासाठी राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे.

प्रशासनाला गांभीर्य का नाही ?
सिंहगडाच्या घाटरस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. मागील वर्षी दरड कोसळून एका तरुण ट्रेकरचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच दरड कोसळल्याने अनेकवेळा घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला होता. दरड प्रतिबंधक कामासाठी सुमारे दीड कोटीचा निधी वन विभागाने वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. मात्र, अद्याप साधे अंदाजपत्रकही मंजूर झालेले नाही. यावर्षी पाऊस सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात पुणे दरवाजाजवळ उंच कड्यावरून दगड कोसळले होते. आता घाटरस्त्यावर चार ते पाच ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. असे असूनही प्रशासनाला गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे.

साधारणतः जुलैमध्ये पावसाने वेग घेतला की, एक्स्प्रेस वे, ताम्हिणी, माळशेज घाट, वरंधा, खंबाटकीसह कोकणातील घाटरस्त्यांवर दरड कोसळण्याच्या घटना सुरू होत असतात. पुण्यातील सिंहगड घाट परिसरात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी दरड कोसळली होती. यातील अनेक घटनांमध्ये मोठ्या आकाराचे दगडही रस्त्यावर कोसळतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये