मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मराठ्यांचे दुसऱ्या जातीशी मतभेद नाहीत त्यामुळे…”
![मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, "मराठ्यांचे दुसऱ्या जातीशी मतभेद नाहीत त्यामुळे..." eknath shinde](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/09/eknath-shinde--780x470.jpg)
जालना | CM Eknath Shinde – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) जालन्यातील (Jalna) अंतरवाली सराटी गावात जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली. त्यानंतर अखेर 17 व्या दिवशी मनोज जरांगेंनी त्यांचं उपोषण सोडलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. पण हे उपोषण त्यांनी मागे जरी घेतलं असलं तरीही त्यांचं साखळी उपोषण सुरूच राहणार आहे. जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला त्यांचा आधिकार मिळाला पाहिजे. मराठ्यांचे दुसऱ्या जातीशी कोणतेही मतभेद नाहीयेत. त्यामुळे रद्द झालेलं आरक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे. आम्ही कोणावरही अन्याय न करता आरक्षण देणार. तसंच जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही देखील मनोज सारखं स्वस्थ बसणार नाही.
मराठा समाजाला सरकारनं 16 आणि 17 टक्के आरक्षण दिलं होतं. पण हे आरक्षण सुप्रिम कोर्टामध्ये रद्द झालं. जेव्हा ते आरक्षण रद्द झालं होतं त्यावेळी 3700 मुलांच्या मुलाखती झाल्या होत्या. त्यावेळी आम्ही त्यांना नोकरी देण्याचं धाडस केलं. जे फायदे ओबीसीला मिळतात ते फायदे आम्ही मराठ्यांना देण्याचं काम केलं. तसंच आता रद्द झालेलं हे आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.