ठरलं! वुमन्स प्रिमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात अदानी-अंबानींचे संघ एकमेकांना भिडणार…

मुंबई : (WPL Time Schedule announced) वुमन्स प्रीमियर लीग 2023 चा ऐतिहासिक लिलाव 13 फेब्रुवारीला पार पडला. या लिलावात अनेक भारतीय महिला क्रिकेटपटूंनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. दरम्यान, लीगचे वेळापत्रक जाहिर झाले आहे. पहिला सामना गुजरात विरुद्ध मुंबई असा रंगणार आहे. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स हे संघ रिंगणात असणार आहेत.
ही स्पर्धा ४ मार्चपासून सुरू होणार असून २६ मार्चपर्यंत खेळवली जाणार आहे. एकूण पाच संघ 22 सामने खेळणार आहेत. सर्व सामने मुंबईतील डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न या दोन स्टेडियमवर खेळवले जातील. 23 दिवसांत साखळी फेरीत 20 सामने खेळवले जातील. याशिवाय एलिमिनेटर आणि अंतिम सामना खेळवला जाईल. पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ४ मार्च रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे.
त्याचबरोबर साखळी फेरीदरम्यान चार डबल हेडर सामने खेळवले जातील. म्हणजेच एका दिवसात दोन सामने खेळवले जातील. पहिला सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल, तर दुसरा सामना 7.30 वाजता सुरू होईल. लीग टप्प्यातील शेवटचा सामना 21 मार्च रोजी यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. तर, एकमेव एलिमिनेटर 24 मार्च रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर आणि अंतिम सामना 26 मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल.