येरे खोक्या… पडरे डोक्या ?
![येरे खोक्या... पडरे डोक्या ? Many Image](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/08/Many-Image--780x470.jpg)
पेटी’ म्हणजे एक लाख अन् ‘खोका’ म्हणजे एक कोटी ! आता लाख मागे पडून कोटींचा बोलबाला असल्याने सध्या खोक्याचीच भाषा बोलली जाते.
मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या भाषेत ‘पेटी’ म्हणजे एक लाख अन् ‘खोका’ म्हणजे एक कोटी ! आता लाख मागे पडून कोटींचा बोलबाला असल्याने सध्या खोक्याचीच भाषा बोलली जाते. एकनाथ शिंदेंसोबत गेलेले ४० शिवसेना आमदार आणि १० अपक्ष यांनी ५०-५० खोके घेऊन (म्हणजे एकाला ५० कोटी, एकूण २५०० कोटी ! आपण फक्त ऐकायचं!!) पैसे घेऊन निष्ठा बदलली, असा दावा शिवसेना ठाकरे गट प्रारंभापासून करत आला आहे.
त्याचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटले. महाविकास आघाडीचे आमदार दररोज विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर उभे राहून घोषणा देऊ लागले- पन्नास खोके, एकदम ओके… गुवाहाटी ओके… खाऊन खोके, माजले बोके… वगैरे
बुधवारी सत्ताधाऱ्यांनी पहिल्यांदा (चोख) उत्तर दिलं अन् राडा झाला!
शिंदे गट आणि भाजपा आमदारांनी घोषणा दिल्या- दाऊदचे खोके, मातोश्री ओके… वाझेचे खोके, मातोश्री ओके… बेस्टचे खोके, मातोश्री ओके… मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे खोके, मातोश्री ओके… अनिल परबचे खोके, मातोश्री ओके… अनिल देशमुखचे खोके, सिल्व्हर ओक ओके… लवासाचे खोके, सिल्व्हर ओक ओके… बारामती ओके वगैरे. यावरून शिंदे गटाचे महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांच्यात बाचाबाचीही झाली.
आमच्या घोषणा झोंबल्यामुळे सत्ताधारी चिडले, असा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. दिसतं मात्र असं की, सत्ताधाऱ्यांच्या घोषणांमध्ये मातोश्री, सिल्व्हर ओक, बारामती ही नावं आल्यामुळे राड्याला तोंड फुटलं.
‘सुपात असलेल्यांनी जात्यात अडकलेल्यांची टिंगल करू नये’ असे आपले पूर्वज उगाच नाही सांगून गेले! मविआच्या आमदारांनी नेमके तेच केले अन् स्वत:च्या नेत्यांना यात गोवले. ‘ये रे धोंड्या, पड रे पाया’ या म्हणीचा नवा अवतार ‘ये रे खोक्या, पड रे डोक्या!’