सोमय्यांचा खरा चेहरा येणार समोर? “…नग्न तर झाले आहात, आता Pen Drive घेऊन येतोय”- अंबादास दानवे

मुंबई | Ambadas Danve – भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर किरीट सोमय्या यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. यामध्ये आता या व्हिडीओ प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Amabadas Danve) यांनी किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नग्न तर झाले आहात, आता पेनड्राईव्ह घेऊन सभागृहात येतोय, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे.
या व्हिडीओ प्रकरणानंतर अंबादास दानवे यांनी एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की, “किरीट सोमय्या नग्न तर झाले आहेत, आता राहील साहील आज करतो. पेनड्राईव्ह घेऊन येतोय. भेटुया, सभागृहात.”
तसंच विधीमंडळाबाहेर अंबादास दानवेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “भाजप नेहमी संस्कृतीच्या, साधनसुचितेच्या गप्पा मारते. आता तर किरीट सोमय्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या प्रकरणी आमच्याशी काही महिलांनी संपर्क साधला होता. त्यामुळे आता या सगळ्या महिला किरीट सोमय्यांची सगळी प्रकरणं समोर आणतील.”
“जर किरीट सोमय्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चौकशी करण्याची मागणी केली असेल तर त्यांचं स्वागतच आहे. यावर देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं चौकशी करावी. तसंच मला सभागृहात संधी मिळाली तर मी योग्य पुरावे देईन”, असंही अंबादास दानवेंनी सांगितलं.