संपादकीयहिस्टाॅरिकल

उरते केवळ ॲनिमल फार्म…!

राजकीय परिस्थीती समाजाला वाकवणारीच असते हे अंतीम सत्य…

आजच्या घडीस सुरू असलेले राजकारण पाहाता मला जॉर्ज ऑरवेल या लेखकाची तीव्रतेने आठवण येते. ज्या लेखकाने १९४८ सालात १९८४ ही कादंबरी लिहून १९८४ सालात समाजजीवन, राजकारण कसे असेल, जीवन कसे असेल याचे वर्णन केले आहे. जागतिक पातळीवर ती कादंबरी लक्षणिय ठरली. त्याबरोबरच पृष्ठसंख्येने छोटेखानी मात्र आशयाच्या बाबतीत चिरंतन असणारी ॲनिमल फार्म ही कादंबरी पुन्हा पुन्हा अनुभवाला येत आहे. या कादंबरीची आज पुन्हा एकदा ओळख करून द्यावी हा लेखनामागचा उद्देश.

All are equal but some are more equal
(लोकशाहीत समानता हे धोरण असतं, पण तरीही राजकीय मंडळी आणि त्यांच्या मर्जीतले लोक “खाशी मंडळी” म्हणून वावरतात.) असं महान वाक्य देणारे ऑरवेल. त्यांनी आपल्या या गाजलेल्या कादंबरीत एक प्रकारे रशियन क्रांती आणि नंतरची दमनकारी कम्युनिस्ट राजवट यावर आधारित असल्याचं सांगितलं जातं. कादंबरीचं कथानक घडतं बऱ्याच वर्षांपूर्वीच्या एका इंग्लंडमधल्या खेड्यात.

एका इंग्लिश व्यक्तीचा शेतकरी-पशुपालन करण्याचा व्यवसाय आहे. गायी, घोडे, गाढवं, कोंबड्या, कुत्रे, मांजरी असा त्याचा बाडबिस्तारा आहे. या प्राण्यांना वाटतं की, आपण कष्ट करतो आणि त्याचा सगळा फायदा या मालकाला होतो. अन्न इतकं पिकतं, पण आपल्याला जेमतेम खायला मिळतं. मांसासाठी आपल्या प्राण्यांची कत्तल केली जाते. हे सगळे प्राणी एकदा बंड करून उठतात आणि मालकाला पळवून लावतात. “आपलं – प्राण्यांचं राज्य” आता आलं म्हटल्यावर सगळे प्राणी समान, कोणी कोणाला त्रास देणार नाही, सगळे मिळून काम करतील, सगळ्यांना पोटभर खायला मिळेल असं ठरवतात.

आता माणसांना आणि माणसांच्या स्वार्थी-क्षुद्र वृत्तीला आपल्यात स्थान नाही. सुरुवातीला हे बरं चालतं. मग मात्र प्राण्यांमधल्या दुष्प्रवृती डोकं वर काढू लागतात. प्राण्यांचं नेतृत्त्व करणाऱ्या डुकरांमध्ये दुफळी माजते आणि एक गट दुसऱ्या गटाला ‘दगाबाज,’ स्वार्थी ठरवून पळवून लावतो आणि नेतृत्त्व आपल्या ताब्यात घेतो. त्या डुकराचं नाव नेपोलियन!

प्राण्यांच्या भल्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. त्यासाठी सगळे प्राणी राब राब राबतात; फक्त डुकरं सोडून. ते स्वतःला विचार करणारे, नियोजन करणारे समजायला लागतात. सगळे समान आणि तत्सम “कायदे’ कळत नकळत बदलत जातात. इतर प्राण्यांची मतं विचारात घेण्याचं फक्त नाटक होतं. डुकरांची हुकुमशाही सुरू होते.

प्राणी आधीही कष्ट करीत होते, आत्ताही करतात. पूर्वीपेक्षा परिस्थिती फार बदललेली नाही. पण आपण स्वतंत्र आहोत, हे सगळं आपल्या भल्यासाठीच चाललं आहे असा “प्रपोगंडा” डुकरं राबवतात. काही मूर्ख प्राणी त्याला भुलतात. काही आळशी प्राण्यांना काहीच फरक पडत नाही. तर विचार करू शकणाऱ्या प्राण्यांना कुत्र्यांच्या हल्ल्याला तोंड द्यावं लागतं. माणसाची गुलामी जाऊन डुकरांची गुलामी नशिबी येते.

आज इथे डुक्कर हा प्राणी विचारात न घेता त्या विचारसरणीची मंडळी म्हणजेच भय, आहार, निद्रा आणि प्रजोत्पादन एवढ्यासाठी विचार, काम करणारे राजकारणीच आपल्या पाहायला मिळतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये