ताज्या बातम्यापुणेहिस्टाॅरिकल

आनंदाची बातमी! न्यायालयाच्या निकालामुळे, भिडे वाड्याचा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा

मुंबई : पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी निर्देश दिले.

पुण्यातील भिडे वाडा येथे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. ही वास्तू महिलांसाठी प्रेरणास्थान आहे. भावी पिढीने देखील त्यातून सामाजिक कार्याची आणि शिक्षणाची प्रेरणा घ्यावी यासाठी या वाड्याचा राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

स्मारकासाठी झालेल्या भूसंपादनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात वाड्यातील भाडेकरूंनी याचिका दाखल केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत वाड्याची जागा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. यामुळे स्मारकासाठीच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला असून स्मारकाच्या कामाला गती येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भिडे वाड्यातील राष्ट्रीय स्मारकासंदर्भात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. गेल्या वर्षी नागपूर येथे झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्यांनी स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेतली होती. त्याचबरोबर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव (ता खंडाळा)येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सर्व बाबींची पूर्तता करून स्मारकाच्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये