भाजप-सेनेचं पुन्हा मनोमिलन! जुन्या सहकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट
मुंबई : (Deepak Kesarkar On Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि भाजप (BJP) यांच्यातून सध्या विस्तवही जात नाही. भाजपला टोले हाणायची एकही संधी ठाकरे सोडत नाहीत. मात्र उद्धव ठाकरेंबद्दल एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय. मविआ सरकारमधून बाहेर पडून उद्धव ठाकरे भाजपसोबत युती करायला तयार होते, असा दावा करण्यात आलाय. शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ माजलीय..
मविआ सरकारमधून बाहेर पडण्यास उद्धव ठाकरे तयार होते. ठाकरे दिल्लीत मोदी-शाहांनाही भेटले होते असा दावा केसरकरांनी केलाय. ठाकरेंना न विचारताच राऊतांनी पवारांना जाऊन सांगितल्याने युती होऊ शकली नाहीत. त्यामुळे खलनायक कोण होतं तुम्हीच शोधा असं म्हणत केसरकरांनी राऊतांवर निशाणा साधलाय. केसरकरांआधी दोनच दिवसांपूर्वी सुनील तटकरेंनीही ठाकरे भाजपसोबत जाणार होते असा गौप्यस्फोट केला होता. तर दरम्यान, शिवसेना ठाकरे गटानं केसरकांचा हा दावा फेटाळून लावलाय.
उद्धव ठाकरे भाजपविरोधी आघाडीचा धडाडीचा चेहरा आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गटापेक्षा ठाकरे भाजपवर बोचरी टीका करतात. आमदार सोडून गेले तरी ठाकरे गटाच्या मेळाव्यांना लक्षणीय गर्दी होते. इंडिया आघाडीच्या बैठकीतही ठाकरेंना मानाचं स्थान आहे. ठाकरे भाजपसोबत जाणार होते, असा नरेटीव्ह सेट झाला तर मविआत संभ्रम निर्माण होऊ शकतो. ठाकरेंची भाजपविरोधाची धार बोथट करण्याचा हा प्रयत्न मानला जातो.
ठाकरे भाजपसोबत जाणार होते, याबद्दल सर्वात आधी तटकरेंनी विधान केलं, त्यानंतर केसरकरांनी ठाकरे-भाजप बोलणी झाली होती, या आशयाचं विधान केलंय. त्यामुळे महायुतीच्या दोन्ही नेत्यांनी ठाकरेंबद्दल केलेल्या या टायमिंगची चर्चा होतेय. आता येत्या २४ ऑक्टोबरला शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे याबाबत काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलीय.