कृष्ण जन्मभूमी वाद! दिल्लीचं तख्त मथुरेतून सांभाळणारा ‘हा’ महान योद्धा माहिती आहे?
नवी दिल्ली : (Shahi Idgah Case)अलाहाबाद हायकोर्टाने गुरुवारी श्री कृष्ण जन्मभूमी मंदिराजवळील शाही इदगाह परिसराचे सर्व्हेक्षण करण्याची परवानगी दिली. त्यानंतर मुस्लिम पक्षकाराने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण, सुप्रीम कोर्टानेही शाही ईदगाह मशिदीचे सर्व्हेक्षण करण्यास स्थगिती देण्यात नकार दिला. या निमित्ताने आयोध्येनंतर आता कृष्ण जन्मभूमीचा वाद देखील पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र या वादाशी मराठे शाहीच्या एका महान सरदाराचे थेट कनेक्शन आहे. ते आपण जाणून घेऊया.
असा दावा केला जातो की औरंगजेबाने श्रीकृष्णाच्या जन्मस्थानावर बांधलेले प्राचीन केशवनाथ मंदिर नष्ट केले आणि त्याच ठिकाणी 1669-70 मध्ये शाही ईदगाह मशीद बांधली. यानंतर 1770 मध्ये गोवर्धन येथे झालेल्या युद्धात मराठ्यांचा विजय झाला. या विजयानंतर मराठ्यांनी पुन्हा मंदिर बांधले. या विजयाचे शिल्पकार होते महादजी शिंदे.
उत्तरेत मराठेशाहीचा भगवा झेंडा फडकवणाऱ्या महादजी यांनी दिल्लीचे तख्त मथुरेत बसूनच अनेक वर्षे सांभाळले. त्यांनी मथुरेत अनेक हिंदू मंदिरे उभारली. ते स्वतः कृष्णभक्त होते. त्यांची कृष्णभक्तीवरील कवने देखील उपलब्ध आहेत.
महादजी शिंदे कोण होते?
महादजी शिंदे यांचा जन्म ३ डिसेंबर १७३० मध्ये झाला. मराठा साम्राज्यातील एक प्रमुख योद्धा म्हणून त्यांना ओळखलं जातं. कमी वयातच त्यांनी आपलं शौर्य दाखवण्यास सुरुवात केली होती. १७४५ ते १७६१ या मराठ्यांच्या राज्य विस्ताराच्या सुवर्णकाळात त्यांनी ५० लढायांचे नेतृत्व केल्याचं सांगितलं जातं. पानीपतच्या तिसऱ्या लढाईतही महादजी यांचा सहभाग होता.
मल्हारराव होळकर यांच्या मदतीने महादजी शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याशी जोडली. त्यांच्याच काळात जोधपूर, जयपूर या मोठ्या राजपूत संस्थानांनी मराठ्यांचे वर्चस्व मान्य केलं. मुघलांच्या सत्तेखालील मथुरा ताब्यात घेतले. त्याठिकाणी अनेक हिंदू मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केल्याचं सांगितलं जातं. मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झालं.