अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात छात्रभारतीकडून निदर्शने!
पुणे : (PhD Students On Ajit Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याविरोधात छात्रभारती पुणेच्या वतीने निदर्शने नोंदवण्यात आली. “पीएचडी करून विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत का,” असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी अधिवेशनात केले होते.
या पार्श्वभूमीवर यावेळी संशोधक विद्यार्थी अमोल शिंगाडे म्हणाले की, “बार्टी, सारथी आणि महाज्योती या योजनांच्या माध्यमातून आज जे विद्यार्थी पीएचडी करत आहेत, यातील बहुतांश विद्यार्थी हे पहिल्या पिढीतले शिकणारे विद्यार्थी आहेत. यातील मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी कोणाचा बाप दगड फोडतोय, तर कोणाचा बाप आज शेतात मजुरी करतोय. अशा परिस्थितीतून शिकणाऱ्या या मुलांसंदर्भात असे वक्तव्य करणे हे अत्यंत निराशाजनक आहे.’
छात्रभारती पुणेचे जिल्हाध्यक्ष प्रफुल कांबळे म्हणाले की, “पीएचडी करणारे विद्यार्थी सहज तिथंपर्यंत पोहचलेले नसतात. त्यासाठी अनेक परीक्षा त्यांना पास कराव्या लागतात. उलट सरकारने सर्व समाजातील विद्यार्थ्यांची सरसकट फेलोशीपची मागणी मान्य करायला हवी. जेणेकरून त्यांच्या शिक्षणातील आर्थिक अडचणी कमी होतील, हीच आमची मागणी आहे.”
दरम्यान, अजित पवार यांनी विधान परिषदेत केलेल्या पीएच.डी करुन काय दिवे लावणार, या वक्तव्याने ठिकठिकाणी विद्यार्थी संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्येही सर्व विद्यार्थी संघटनांकडून विद्यापीठ बंदची हाक दिली आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसरात शुक्रवारी शुकशुकाट पहावयास मिळाला.