
डॉक्टराच्या निष्कळीपणामुळे मृत्यू झालेल्या ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता, तीन वर्षानंतर तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे. पुण्यातील ससून वैद्यकीय समितीने डॉक्टरने उपचारात निष्काळजीपणा केल्याचा अहवाल दिल्यानंतर, संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. प्रदीप पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. वाकड येथील एका रुग्णालयात ते कार्यरत आहेत. तर, मंजुषा भागवत असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी संतोष भागवत यांनी वाकड पोलिसात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट २०१८ रोजी मंजुषा यांना थंडी, ताप, खोकला आणि कफ येत असल्याने त्यांचे पती संतोष भागवत हे त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात घेऊन गेले, तिथे डॉक्टारांनी त्यांना तीन दिवसांच्या औषध, गोळ्या दिल्या. परंतु, तीन दिवस होऊन ही मंजुषा यांची प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर, दिनांक १ सप्टेंबर २०१८ रोजी संतोष यांनी मंजुषा यांना वाकड येथील रुग्णालयात आणले. तिथं आरोपी डॉ. प्रदीप पाटील यांनी मंजुषा यांच्यावर उपचार सुरू केले. अगोदरच्या औषधांची चिठ्ठी त्यांना दाखवण्यात आली. मंजुषा यांची ब्लड टेस्ट करण्यात आली, त्यात रक्तातील प्लेट्लेस कमी झाले असल्याचा निष्कर्ष डॉ. प्रदीप यांनी काढला. मग त्यानुसार गोळ्या, औषधी देण्यात आल्या. पुढील तीन दिवस देखील मंजुषा यांना बरे वाटत नव्हते.
त्यांची तब्येत आणखीच खालावत होती. पुन्हा ३ सप्टेंबर २०१८ रोजी संतोष भागवत यांनी पत्नी मंजुषाला डॉ. प्रदीप पाटील यांच्याकडे नेले. कफ कमी झाल्याचे सांगण्यात आलं. तपासणी करून पुन्हा औषध दिली. अशक्तपणा आल्याने मंजुषा यांनी सलाईन लावण्यास सांगितलं होतं. ४ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांना ताप, खोकला येत होता शिवाय धापही लागत होती. म्हणून संतोष भागवत यांनी मंजुषा यांना आदित्य बिर्ला रुग्णालयात नेले. तिथं डॉक्टरांनी तुमच्या पत्नीचा छातीचा एक्सरे काढला नाही का? अशी विचारणा करण्यात आली. तेव्हा, डॉ. प्रदीप पाटील यांनी काही सांगितलं नाही असे संतोष भागवत म्हणाले. त्यावर तातडीने त्यांना मंजुषा यांचा एक्सरे काढण्यास सांगितलं त्यात एका बाजूला ५० तर दुसऱ्या बाजूला ७५ टक्के न्यूमोनिया छातीत पसरल्याच समोर आलं.
तसेच, मंजुषा यांची प्रकृती खालावत जात असून त्यांच्या जीवाला धोका आहे, असं सांगण्यात आलं. अन दुसऱ्याच दिवशी मंजुषा यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संतोष यांनी डॉ. प्रदीप यांच्या निष्कजीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची तक्रार वाकड पोलिसात दिली. त्यानुसार, ससून वैद्यकीय समितीने अहवाल दिला असून यात डॉ. प्रदीप पाटील यांनी उपचारादरम्यान निष्काळजीपणा केल्याचं आढळले आहे. डॉ. प्रदीप पाटील यांच्यावर कलम ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.