“…तर सरकार चालवण्याची जबाबदारी मी घ्यायला तयार” ; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान!

मुंंबई : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख घटक पक्षांची बैठक पार पडली. यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्यं, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील गावांवर केलेला दावा, महाराष्ट्रातून परराज्यात जाणारे उद्योग यासह राज्यातील सद्यस्थितीस असलेल्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये काही निर्णय घेण्यात आले याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षांतील महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “असं पहिल्यांदाच दिसतय की महाराष्ट्रात फुटीरतेची बीजं टाकली जात आहेत. काही गावं म्हणतात आम्हाला कर्नाटकात जायचं, तर काही तेलंगणात, गुजरातमध्ये जायचं असं म्हणत आहेत. हे आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं. छत्रपतींचा एकसंघ महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न हेतुपरुस्सर केला जात आहे. कोण करतय हे सांगण्याची गरज नाही. कर्नाटक सरकार फार आक्रमकतेने आपल्या महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगत आहे. आपल्या राज्याला सरकार आहे की नाही? हा प्रश्न निर्माण झालेला आहे.” असं ते म्हणाले.
याचबरोबर, सीमावासीयांना पाठिंब्याची गरज असताना विरोधी पक्षापैकी कोणी तिथे दौरा करणार आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आम्ही कधीही जाऊ शकतो. यापूर्वीही आमचे काहीजण गेलेले आहेत. छगन भुजबळ, संजय राऊत हे इथे आहेत. आता शेवटी कोणाची जबाबदारी आहे, ते ती जबाबदारी स्वीकारणार आहेत की नाही? ही काय हिंदुस्थान-पाकिस्तानची सीमा रेषा नाही, पण जसं कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे बोलत आहेत तसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आवंढा गिळून तरी काही तरी बोलणार का? की ते सुद्धा गुवाहाटीला जाऊन बोलणार आहेत. सरकराने जाहीर करावं त्यांना जमत नाही. मग आम्ही काय करायचं ते करतो. अगदी सरकार चालवण्यापासून बेळगावात जाण्यापर्यंतची सगळी जबाबदारी मी घ्यायला तयार आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.