पॅचवर्क खड्ड्यांपेक्षा जास्त धोकादायक

पुणे : पावसाळ्यात रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिका प्रशासनावर टीका झाली. आत्तापर्यंत सुमारे १८ हजार खड्डे प्रशासनाने बुजविले आहेत. पण तरीही रस्त्यांची स्थिती सुधारलेली नाही. अनेक ठिकाणी पॅचवर्क करून खड्डे बुजविले आहेत. पण हे पॅचवर्क खड्ड्यापेक्षा जास्त धोकादायक ठरत आहे.
त्यामुळे उलट धक्के बसण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते पुन्हा एकदा डांबरीकरण करणे आवश्यक आहे. आता यावर उपाय म्हणून महापालिकेने पावसाळ्यापूर्वी बम्पीनेस मशिनद्वारे रस्त्यांची तपासणी केली होती, त्यात ६१ किलोमीटरचे रस्ते खराब आढळून आले होते.
परतीच्या पावसाने पुन्हा डोके वर काढल्याने खड्यांमध्ये आणखी भर पडली असल्याने रस्त्याची तपासणी होणे आवश्यक असते. या मशिनद्वारे पुन्हा तपासणी करण्यात येणार असून त्यानुसार सर्व रस्ते पूर्णपणे डांबरीकरण करण्यासाठी व खोदाई करून नव्याने करण्यासाठी सुमारे ४०० कोटी खर्च येईल अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, ‘बम्पीनेस मशिनद्वारे एका किलोमीटरमध्ये कितीवेळा खालीवर असे धक्के बसतात त्याचे प्रमाणे मिलमिटरमध्ये मोजले जाते. त्यावरून दर्जा रस्त्याचा काढला जातो. ० ते १६०० एमएम म्हणजे उत्कृष्ट, १६०० ते ३००० एमएम साधारण रस्ता, ३००० ते ६००० एमएम म्हणजे दुरुस्ती आवश्यक, ६००० ते १००० म्हणजे चांगल्या पद्धतीने डांबरीकरण करणे आवश्यक आणि १०००० एमएमच्या पुढे म्हणजे संपूर्ण रस्ता उकरून तो नव्याने करणे आवश्यक असते. या कंपनीकडून रस्त्याचे विश्लेषण करणारा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
पथ विभागाने पावसाळ्यापूर्वी एका कंपनीकडून १२ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांची बम्पीनेस मशिनव्दारे तपासणी केली. या मशिनमध्ये एका किलोमीटरमध्ये कितीवेळा हादरे बसले त्यावरून रस्त्याची स्थिती चांगली आहे की वाईट हे ठरवले जाते. त्यानुसार ४०० किलोमीटर पैकी ६१ किलोमीटरचे रस्ते खराब झाल्याचे आढळून आले आहे. पावसाळ्यात यात आता आणखी भर पडली आहे.
या कंपनीकडून शहरातील इतर रस्त्यांची तपासणी केली जाणार असून, या सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल लवकरच प्राप्त होईल. शहरातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी सुमारे चारशे कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे देखील व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले. अहवाल मिळाला की त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे कुलकर्णी यांनी सांगितेल.