“…मग काय पाकिस्तानात जाऊन म्हणायची हनुमान चालीसा”:भोंगा प्रकरणावर साधूंची प्रतिक्रिया
!["...मग काय पाकिस्तानात जाऊन म्हणायची हनुमान चालीसा":भोंगा प्रकरणावर साधूंची प्रतिक्रिया THACKEREY00](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/04/THACKEREY00.jpg)
नाशिक : नाशिक रोड येथील महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी मशिदींवरील भोंगा प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र शासनाला सर्व संत समाजाच्या वतीने मला प्रश्न करायचा आहे, की हनुमान चालिसा, वेद मंत्रपाठ हे भारतात म्हणायचे नाहीत, तर मग काय पाकिस्तानात जाऊन म्हणायचे?
राज ठाकरे यांनी गुढी पाडव्या दिवशी शिवाजी पार्कावरील भाषणातून मशिदीवरील भोंग्यांना विरोध केला होता. मशिदीवर भोंगे का? असा सवाल त्यांनी केला होता. तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवले तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरू करू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. पुढे ते म्हणाले होते की, तुमच्या भोंग्यांचा आम्हाला त्रास होतो. मी कोणत्याही प्रार्थनेविरोधात नाही. तुम्ही तुमची प्रार्थना जरूर करा. पण त्याचं सार्वजनिक प्रदर्शन नको. युरोपात तरी कुठे भोंगे आहेत? असा सवाल त्यांनी केला होता.
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. आणि पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्यांच्यावर कारवाई सुरु केली. यावर आता विविध क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.