ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळीशेत -शिवार

राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना थेट सवाल; म्हणाले, “अडचणीच्या काळात माझ्याकडे येता, अन् मतदानाच्या वेळी…”

मुंबई : (Raj Thackeray On State Farmers) मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज नाशिकमधल्या काही शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली आणि आपल्या अडचणी सांगितल्या. त्यावेळी अडचणीच्या काळात तुम्ही मला भेटायला येता आणि मतदान पिळवणूक करणाऱ्यांना का करता? असा प्रश्न राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना विचारला आहे. तसंच शेतकरी प्रतिनिधींसह आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊ असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र शेतकऱ्यांना उद्देशून त्यांनी जे वक्तव्य केलं ते चांगलंच चर्चेत आहे.

“मध्यंतरी शेतकऱ्यांनी संप केला होता. तेव्हा काही शेतकरी बांधव मला भेटायला आले होते. मी त्यांना सांगितलं, अडचणींच्या काळात माझ्याकडे येता आणि मतदानाच्या वेळी मतदान त्यांना करता. त्यावेळी मला शेतकरी बांधव म्हणाले साहेब अडचण वेगळी आणि मतदान वेगळं. जे तुम्हाला मदत करत नाही त्यांना तुम्ही मतदान करत आलात तर अडचणींच्या काळात तुम्ही माझ्याकडे का येता? ज्यांनी सांगितलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करतो त्यांना तुम्ही मतदान केलंत की नाही? आपण काय करतो आहोत त्याचं भान ठेवा.”

“निवडणुकीच्या काळात पैसे घेऊन बाकी सगळ्या गोष्टी घेऊन कुणाला मतदान करता? मग पाच वर्षे त्यांच्या नावाने टाहो फोडता आणि परत निवडणुका आल्यावर त्यांनाच मतदान करता. मग कशासाठी हा खेळ खेळतो आहोत? मी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटतो. मात्र काय करतो आहोत त्याचं भान ठेवा. कारण तुम्ही मतदान त्यांना करता त्यामुळे त्यांना वाटतं की हे मतदान आपल्यालाच करणार आहेत. त्यांना काही फरकच पडत नाही.” असं म्हणत राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

आज आमच्यासह अनेक शेतकऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंनी आम्हाला हे सांगितलं आहे की तुम्ही परत या. तुमच्या जमिनींचे जे प्रश्न आहेत त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी तुमचं बोलणं करुन देतो. तुम्हाला न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे आम्ही आज समाधानी आहोत. आम्ही आमच्या जमिनीला आईच्या ठिकाणी मानतो. आज राज ठाकरेंनी आमच्या जमिनीबाबतच्या समस्या जाणून घेतल्या. आमच्या जमिनींचे बँकेकडून लिलाव केले जात आहेत. त्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्या आहेत. राज ठाकरेंनी आम्हाला मदतीचं आश्वासन दिलं आहे. राज ठाकरेंना आम्ही हे देखील सांगितलं की तुम्ही अडचणी आल्या की माझ्याकडे येता आणि मतदान दुसऱ्याला करता असंही म्हणाले. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्यासह आहोत. आम्हाला मदतीचं आश्वासन राज ठाकरेंनी दिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये