देवघर रोपवे अपघात : 46 तासांनंतर सर्व प्रवाशांची सुटका; तर तिघांचा मृत्यू

देवघर : काल झारखंडमध्ये देवघर येथील त्रिकूटजवळ झालेल्या रोपवेच्या अपघातात ट्रॉलीमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांची 46 तासांनंतर सुटका करण्यात आली. भारतीय लष्कर, हवाई दल, एनडीआरएफ, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) आणि जिल्हा प्रशासनाने परस्पर सहभागाने हे संपूर्ण बचावकार्य पार पाडले. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना देवघर सदर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
यासंदर्भात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी झालेल्या या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. देवघरचे उपायुक्त (डीसी) मंजुनाथ भजंत्री यांनी सांगितले की, हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे रोपवेच्या गाड्या एकमेकांवर आदळल्या, त्यामुळे हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.
झारखंडमधील देवघर येथील त्रिकूट टेकडीवर रोपवेच्या अनेक ट्रॉली एकमेकांवर आदळल्या, या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर रोप-वेच्या केबिनमध्ये अनेक प्रवासी अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी बचाव पथकाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरु करण्यात आले होते. अखेर 46 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अडकलेल्या सर्व प्रवाशांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले.