विश्लेषण

हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय; कोल्हापुरात चौघांना सक्तमजुरी

कोल्हापूर : मुलींच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांना वेश्याव्यवसायात आणणार्‍या, तसेच एका मुलीची विक्री करणार्‍या टोळीला न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. पुण्यात डीजे ऑपरेटिंगचा कोर्स शिकणार्‍या नेपाळी मुलीची या टोळीतील महिलांनी विक्री केली आहे. दुसरी मुलगी वडिलांच्या आजारपणामुळे जाळ्यात अडकली.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत आरोपी सरिता रणजित पाटील (वय ४१, रा. पाचगाव, करवीर), विवेक शंकर दिंडे (३१, रा. राजारामपुरी), मनीषा प्रकाश कट्टे (३०, रा. भोसलेवाडी, कोल्हापूर) या तिघांना १० वर्षे सक्तमजुरी व २९ हजार रुपये दंड ठोठावला. वैभव सतीश तावसकर (वय २८, रा. पांगरी, सोलापूर) याला दोन वर्षे सक्तमजुरी व ४ हजारांचा दंड सुनावला.

आरोपी सरिता पाटील कळंबा येथील अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालवत होती. विवेक दिंडे व वैभव तावसकर गरजू व असहाय महिलांना वेश्याव्यवसायासाठी सरिता पाटील हिच्याकडे घेऊन येत होते. २०१९ मध्ये करवीर पोलिसांनी कळंबा कुंटणखान्यावर छापा टाकून पीडित मुलीची सुटका केली होती.

नेपाळी मुलीची विक्री
पोलिसांनी सुटका केलेल्या पीडित मुलींपैकी एक मुलगी नेपाळची आहे. ती पुण्यामध्ये डीजे ऑपरेटरचे शिक्षण घेत होती. तिची मोठी बहीण कोल्हापूरमध्ये राहण्यास होती. २०१९ मध्ये फ्रेन्डशिप डेनिमित्त पार्टीसाठी ती कोल्हापुरात आली होती. ती मेकअपसाठी ताराबाई पार्कातील पार्लरमध्ये गेली असता आरोपी मनीषा कट्टे हिने ‘तू दिसायला छान आहेस, तुला जॉबपेक्षा जास्त पैसे मिळतील,’ असे आमिष दाखवले. तिला पाचगावच्या बंगल्यात नेऊन आरोपी सरिताची ओळख करून दिली. त्यानंतर पीडितेला जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले. तसेच मनीषाने तिची सरिता पाटील हिला विक्री केल्याचेही समोर आले.

आजारपणाचा गैरफायदा
दुसरी पीडिता गरीब घरातील आहे. तिचे वडील आजारी असल्याने त्यांच्या औषधोपचारामुळे तिला अडचणी होत्या. तिचीही पार्लरच्यानिमित्ताने सरिता पाटीलशी ओळख झाली. सरिता पाटील व विवेक दिंडे यांंनी तिला कळंबा येथील फ्लॅटवर नेऊन वेश्याव्यवसायासाठी भाग पाडले. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्यात आला. सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी दोन्ही पीडित मुलींसह एकूण अकरा साक्षीदार तपासले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये