राज्यात २२५ प्रकल्प; दोन लाख कोटींची भेट; विराेधकांना चपराक
राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
मुंबई : देशभरात आज पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात सरकार करत असलेली विक्रमी गुंतवणूक रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी दोन लाख कोटींहून अधिक मूल्याच्या सुमारे २२५ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या शिंदे-फडणवीस सरकार विरोधात प्रकल्प पळवल्याच्या प्रचाराला जोरदार चपराक लगावली आहे.
७५ हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प आणि आधुनिक रस्त्यांच्या ५० कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांचे काम सुरू आहे किंवा लवकरच काम सुरू होणार आहे, असे त्यांनी सांगितले. “सरकार पायाभूत सुविधांवर एवढा मोठा खर्च करते, तेव्हा रोजगाराच्या लाखो नवीन संधी निर्माण होतात” अशा शब्दात त्यांनी समारोप केला.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी महाराष्ट्र सरकारच्या रोजगार मेळाव्याला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. पंतप्रधानांनी, धनत्रयोदशीच्या दिवशी केंद्रीय स्तरावर रोजगार मेळाव्याच्या संकल्पनेचा शुभारंभ केला होता. केंद्र सरकारच्या पातळीवर दहा लाख नोकऱ्या देण्याच्या मोहिमेची ही सुरुवात होती. तेव्हापासून पंतप्रधानांनी गुजरात आणि जम्मू-काश्मीर सरकारच्या रोजगार मेळाव्यांना संबोधित केले आहे.
इतक्या कमी कालवाधीत झालेले रोजगार मेळाव्याचे आयोजन पाहता “महाराष्ट्र सरकार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृढ संकल्पाने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या काळात महाराष्ट्रात अशा रोजगार मेळाव्यांचा अधिक विस्तार होईल याचा मला आनंद आहे” असे मोदी पुढे म्हणाले. महाराष्ट्राचा गृह विभाग आणि राज्याच्या ग्रामीण विकास विभागात हजारो नियुक्त्या होणार आहेत, असे मोदी म्हणाले.