“ये भोगी! शिक आमच्या ‘योगी’कडून”, योगींच्या भोंगा उतरवण्याच्या निर्णयानंतर अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात भोंग्यांवरून राजकारण चांगलाच तापलेलं आहे. विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीला धारेवर धरलं आहे. त्यावर काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती मात्र त्या बैठकीला मनसे आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी आपली उपपस्थिती दर्शविली नाही.
या प्रकरणात आता अमृता फडणवीस यांनीदेखील उडी घेतली आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मशिदींवरील भोंगे उतरवले आहेत. त्यासंदर्भात अमृता फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विट करुन टीका केली आहे. “ये भोगी, काही तरी शिक आमच्या ‘योगीं’कडून !, असा अमृता यांनी ठाकरे यांना सल्ला दिला आहे.
दरम्यान मशिदींवरील भोंगे काढल्यासंदर्भात राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले, उत्तर प्रदेशातील धार्मिकस्थळांवरील, विशेषतः मशिदींवरील भोंगे उतवरल्याबद्दल योगी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!, असा टोला राज यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लगावला आहे. महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना, असे राज म्हणाले.