संडे फिचर

येवा कोकण आपला असा!

कोकण म्हटले की, समोेर येतो तो निळाशार समुद्रकिनारा आणि तेथील मातीत पिकणारा हापूस आंबा! नारळ, पोफळी, सुपारी यांच्या बागा. मग कोकणला जाणे कोेणाला नाही आवडणार? आज आपण अशीच छोटीशी कोकणची सहल करून येऊया!

कोकणची माणसं साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
उंची माडांचीया जवळूनी मापवा
तिच्या घोवाला कोकण दाखवा
गोेमू माहेरला जाते हो नाखवा
तिच्या घोवाला कोकण दाखवा’

या गाण्यांच्या ओळीत कोकणच्या माणसांप्रती असणारे प्रेम आपल्याला कळले असेलच. कोकणाविषयी प्रेम नसणारा महाराष्ट्रातील असा एकही माणूस शोधून सापडणार नाही. महाराष्ट्राला लाभलेला कोकणचा समुद्रकिनारा म्हणजे अरबी समुद्र! आजच्या लेखात आपण अशीच छोटीशी कोकणची ओळख करून घेऊया!

स्वत:ची कार किंवा भाडेतत्त्वावरील गाडी असल्यास फार सोयीचे होते. उन्हाळ्यात जात असाल तर गाडीमध्ये एसी असणे आवश्यक आहे. कारण येथील उन्हाळा तीव्र असतो. पुण्यापासून ताम्हिणी-माणगावमार्गे गेल्यानंतर हरिहरेश्वर हे रायगड जिल्ह्यातील असेच एक प्रेक्षणीय स्थळ. हरिहरेश्वर येथे महादेवाचे मंदिर व काळभैरवनाथाचे मंदिर आहे. येथे सकाळीच तुम्ही पोहोचलात तर तेथील मंदिरालगतच्या घरात आंघोळीची सोय होते. आंघोळ करून तुम्ही महादेवाचे दर्शन घेऊ शकता.

मंदिरापाठीमागे डोंगराच्या कड्यातून फेसाळणार्‍या लाटा पाहण्याचा आनंद काहीच औरच. पण येथील समुद्र हा रौद्र रूप धारण करीत असतो. येथे कोणीही पाण्यात पोहण्यासाठी उतरू नये, असे येथील रहिवासी सांगतात. समुद्राच्या लाटा आदळून येथील डोंगरांवर भेगा पडल्या आहेत. येथील डोंगराला वळसा घालून समुद्र पाहून परत मंदिरात येता येते. येथेे आपण नाश्ता करून पुढील प्रवासासाठी निघू शकता.

पुढे चार किलोमीटर आपणास बाणकोट जेटीमध्ये गाडी चढवून खाडीतून पलीकडे जाता येते. येथे साधारणत: २८० ते ३४५ रुपये कार आणि चारजणांचे इतके तिकीट आकारले जाते. पलीकडे आपण रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात प्रवेश करतो. जेटीने प्रवास केल्यामुळे आपला वेळ आणि काही किलोमीटरचे अंतर वाचते. येथे वेळास सुमद्रकिनारी कासवे पाहता येतात. पण येथे संध्याकाळी ४ नंतर ‘कासव संमेलन’ भरते.

वेळास मार्गे पुढे जाऊन तुम्ही आंजर्ले येथील कड्यावरील श्रीगणपती देवस्थान येथे गणपतीचे दर्शन घेऊ शकता. मंदिराच्या मागील बाजूस श्री गणपतीची पावले आहेत. येथूून आंजर्ले समुद्र किनार्‍याचे दृश्य डोळ्यात साठवण्यासारखे आहे. या ठिकाणाहून सुवर्णदुर्ग, कणकदुर्ग, फत्तेगड किल्ल्यांचे दर्शन घडते.

या ठिकाणाहून निघाल्यानंतर आपण हर्णे समुद्र किनारी पोहचता येते. गाडीतून फिरताना लहान रस्त्याने दोन्ही बाजूंनी आंब्यांच्या बागा, नारळाच्या बागा, गर्द झाडी असे दृश्य न्याहाळत आपण कधी हर्णेत पोेहोचता हे कळतही नाही. हर्णे समुद्र किनारी संध्याकाळी ४ नंतर कोळी बांधवांनी पकडलेल्या माशांचा बाजार भरतो. योग्य भाव करून तुम्ही मासे खरेदी करू शकता. मासे खरेदी केल्यानंतर पुढे मुरुड, कर्दे किंवा लाडघर समुद्र किनारी पोेहचू शकता.

वरील ठिकाणी निवासाची उत्तम व्यवस्था आहे आणि येथील समुद्रात खेळण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. रूम आणि समुद्र हे अगदी समोरासमोेरच आहे. येथील समुद्र सुरक्षित असल्याचे येथील रहिवासी सांगतात. पोहता येत नसणार्यांनी पाण्यात जास्त आत जाणे टाळावे. येथील सुर्यास्त पाहण्याचा लुटण्यात रममाण होऊन कुटुंबासमवेत एक रात्र येथे मुक्काम करून पुढील प्रवास सकाळी करावा. येथे रहिवासी प्रति किलोवर मासे बनवून देतात. येथील जेवण फार उत्तम आहे. त्याबरोबर सोलकढी प्यायची मज्जा काही औरच…

दुसर्या दिवशी परत सकाळी समुद्रात डुंबण्याचा आनंद लुटल्यानंतर आंघोळी उरकून पुढील प्रवासासाठी निघावे. येथे काही किलोमीटरवर बुरोंडी येथे ‘भगवान परशुराम भूमी’ हे पाहण्यासारखे प्रेक्षणीय स्थळ आहे. येथे ४० फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर २१ फूट उंची असलेली परशुरामाची भव्य मूर्ती उभी केलेली आहे. फेरोक्रीट पद्धतीने हा पृथ्वीचा अर्धगोल बांधला आहे. येथून पुढे काही अंतरावर दाभोळ-धोपवे जेटीमध्ये कार चढवून पलीकडे गुहागर तालुक्यात पोहोचता येते. येथेही वरीलप्रमाणे दर आकारला जातो आणि वेळ, अंतर वाचते. गुहागर शहरामधील श्री देव व्याडेश्वर मंदिर हे पाहण्यासारखे आहे. याच मार्गे पुढे गेल्यावर श्री देव वेळणेश्वर श्री देव कालभैरव देवस्थान संस्थानला भेट नक्की द्याच. समुद्रकिनारी वसलेल्या या महादेवाचे दर्शन घेऊन मंदिराच्या पाठीमागे असलेल्या छोट्यासा हा किनारा अगदी मनात घर करतो. येथे खूप रात्र होत असेल तर राहण्याची व्यवस्था आहे. येथे एमटीडीसीच्या रूम आहेत.

येथून पुढे हेदवीचे गणपतीचे दर्शन घेता येते. तसेच पुढे बामणघळ येथे जाऊन तेथे समुद्राच्या लाटांपासून तयार झालेली घळ पाहता येते. पण येथे सावधानता बाळगणे गरजेचे आहे. घळीच्या अगदी जवळ जाऊ नये. फेसाळणारे पाणी घळीमधून डोंगरावर उडते हे लांबूनच पहावे. येथे पुढे लवकर निघणे गरजेच आहे कारण पुढे रात्री ८.४५ ची तवसाळ जेटमध्ये जयगडला पोहाचून पुढे जयगडमार्गे गणपतीपुळेला जाता येते.

गणपतीपुळे शहरात पोहचल्यानंतर राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. येथे भक्त निवासामध्ये अगदी माफक दरात राहण्याची व्यवस्था होते. सकाळी लवकर गणपतीचे दर्शन करून परतीच्या प्रवासाला निघता येते. निवळीमार्गे मुंबई-गोेवा हायवेने चिपळूणमार्गे परतताना परशुरामाचे मंदिर आहेत. येथून पुढे संगमेश्वर कसबा येथील संगमेश्वर व कर्णेश्वरच्या महादेवाचे दर्शन घेता येते. पुढे कशेड-आंबेनळी घाटातून महाबळेश्वरमार्गे पुण्यात येता येते. ही तीन दिवसांची छोेटीशी सहल आपल्याला आल्हाददायक आनंद देऊन जाते.

_अमृत सहाणे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये