‘देवमाणूस’ किरण गायकवाडचा मोठा निर्णय, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

देवमाणूस मधून डॉक्टर अजितकुमार देव म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचला आहे. त्याच्याबद्दल जाणून घ्यायला चाहते कायमच उत्सुक असतात, परंतु सोशल मीडियाबाबत किरणनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मालिकेच्या कथानकानं प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली आहे. त्यामुळेच देवमाणूस मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिल्यामुळे मालिकेचा सिक्वेल झी मराठीवरून प्रसारित केला जात आहे. त्यालाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. मालिकेतील सर्व कलाकारदेखील खूपच लोकप्रिय झाले आहेत. त्यातही सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली आहे ती, डॉक्टर अजितकुमार देव म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड याला. किरणदेखील सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. त्याच्या व्यक्तिगत तसंच व्यावसायिक आयुष्याबद्दलची माहिती प्रेक्षकांना देत असतो, परंतु आता सोशल मीडियासंदर्भात किरणनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची निराशा होण्याची शक्यता आहे.
‘देवमाणूस’ या मालिकेमध्ये किरणची भूमिका नकारात्मक आहे. मात्र तरीदेखील प्रेक्षकांच्या मनात त्यानं स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे.
मालिकेबरोबरच किरण सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असतो. सतत नवनवीन व्हिडिओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. त्यांच्याशी संवादही साधत असतो. किरण शेअर करत असलेल्या पोस्टवर त्याचे चाहते भरभरून कॉमेन्ट करत असतात. मात्र आता किरणनं सोशल मीडियावरून अल्पविराम घेत असल्याची पोस्ट शेअर केली आहे. किरणच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
किरण गायकवाडनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने पोस्ट शेअर करत लिहिलंय, ’’काही काळासाठी इन्स्टाग्राम बंद,#भेटू लवकरच’’. किरणच्या या पोस्टमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. किरणनं हा निर्णय का घेतला याबद्दल त्यानं काहीही लिहिलेलं नाही.मात्र भेटू लवकरच या वाक्यामुळे तो पुन्हा सोशल मीडियावर परतेल असा दिलासा चाहत्यांना मिळाला आहे.
किरण गायकवाडनं झी मराठीवरून २०१७ मध्ये प्रसारित झालेल्या ‘लागीर झालं जी’ या मालिकेत भैय्यासाहेबांची भूमिका साकारली होती. त्यानंतर २०२० मध्ये देवमाणूस मालिकेत किरणला अजितकुमार देवची भूमिका साकारत आहे. सहाय्यक अभिनेता ते मुख्य कलाकार असा प्रवास पार करत किरणनं मोठा टप्पा पार केला आहे.