अभंगवाणीला धायरीकरांचा उदंड प्रतिसाद
![अभंगवाणीला धायरीकरांचा उदंड प्रतिसाद vittyhal](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/07/vittyhal-780x470.jpeg)
पुणे : माझे माहेर पंढरी’ अभंगवाणी कार्यक्रमाला धायरीकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात पंडित संजय गरुड यांनी आपल्या स्वरचित रचना सादर करून भारतरत्न पंडित भीमसेनजी जोशी यांनी अजरामर केलेली अभंगवाणीची आठवण करून दिली. आषाढी एकादशीनिमित्ताने धारेश्वर मंगल कार्यालय, सिंहगड रोड येथे कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार मंत्र जय जय राम कृष्ण हरीने करताच भक्तिमय वातावरण तयार झाले. त्यानंतर पंढरी निवासा, राजस सुकुमार, इंद्रायणी काठी असे एकापेक्षा एक सरस अभंगांच्या सादरीकरणातून श्रोत्यांना पंढरीचे दर्शन घडविले. आपल्या किराणा घराण्याच्या गायनशैलीतून माझे माहेर पंढरी, विठ्ठल गीती गावा, कानडा राजा पंढरीचा अशा दमदार अभंगांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. भक्तीमय वातावरणातील विठ्ठलभक्तांच्या मनाचा ठाव घेत पंढरपूरला न जाताही त्यांना परमात्मा पांडुरंगाचे दर्शन घडविले.
विठ्ठलभेटीचा अनोखा भाव रसिकांच्या चेहर्यावर दिसत होता. रसिकाग्रहास्तव बाजे मुरलिया आणि लक्ष्मी बारम्मा गाऊन विठ्ठलाच्या पायी थरारली वीट या भैरवीने आपल्या सुरेल, दमदार मैफलीची सांगता पंडित गरुड यांनी केली. कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद केंद्रीय संयुक्त मंत्री, अखिल भारतीय सत्संग सहप्रमुख दादासाहेब वेदक प्रमुख पाहुणे होते. पंडित गरुड यांना पं. शिवदास देगलूरकर (हार्मोनियम), किशोर कोरडे (तबला), माऊली फाटक (पखवाज), तन्मय ढोकळे (टाळ) आणि हरी घनवट, दिनेश माझिरे (तानपुरा), ओंकार कोरपडे व ब्रह्मनाद संगीत महाविद्यालय शिष्यवर्ग यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे भावात्मक निरुपण स्मिता आजेगावकर यांनी केले. शताक्षी खमंग व्हेज, जोशीज् किचनच्या प्रीती जोशी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अतुल चाकणकर आणि माधुरी चाकणकर यांनी केले होते.