पावसात मिरची भिजली
![पावसात मिरची भिजली sketting 7](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/10/ेsketting-7-780x470.jpg)
शेतकरी चिंतेत; लाखोंचे नुकसान
नंदूरबार : परतीच्या पावसाने राज्यात कहर केला आहे. राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे हातातील पिके वाया गेली आहेत. नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती पिकांबरोबरच व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या लाल मिरचीलाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी आता चिंतेत आहेत. जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. याचा शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. कोट्यवधी रुपयांच्या लाल मिरचीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नुकसानभरपाई द्यावी…
जिल्ह्यात पावसामुळे मिरचीसह कापूस, ज्वारी आणि सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणखी दोन दिवस पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आणखी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातील खरीप हंगाम वाया गेल्याने सरकारने सरसकट एकरकमी मदत जाहीर करुन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नंदूरबार बाजार समितीत ओली मिरची खरेदी करुन पथार्यांवर वाळवण्यासाठी टाकली जात असते. मिरचीचा हंगाम सुरू झाला असून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली हजारो क्विंटल मिरची परतीच्या पावसात ओली होऊन खराब झाली. हजारो क्विंटल मिरची पावसात भिजल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मिरची व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या मिरचीला विमा सुरक्षा कवच द्यावे परतीचा पाऊस आणि अवकाळी पाऊस यामुळे मोठे नुकसान होत असते. मात्र, सरकार याकडे लक्ष देत नसल्याने व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे व्यापारी म्हणत आहेत. दरम्यान, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत तरी मिळणार का, अशी चर्चा आहे.