विरोधी पक्षाची जागा उद्धव ठाकरेंनी पटकावली! राष्ट्रवादीची झाली पंचाईत

फोकस हालला :
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाच्या वेगवान घडामोडीत सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट यांच्यावर आक्रमक टीका करत तुटून पडणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विरोधी पक्षाचा नेता असा ‘फोकस’ राहिला आहे.
राजेंद्र पंढरपूरे |
पुणे : विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली आणि ५० आमदारांच्या सहाय्याने भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करत सत्ता मिळवली. ठाकरे यांचे सरकार पाडले. विधीमंडळातील आणि संसदेतील ठाकरे यांची ताकद कमी केली. पण, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटावर प्रतिहल्ला चढवत विरोधी पक्षाचे स्थान आपल्याकडे खेचून आणलेले आहे. अवघ्या दोन, तीन महिन्यात उद्धव ठाकरेंनी ही किमया केली. त्यामुळे राजकीय अभ्यासकही चक्रावून गेले आहेत. गेले तीन, चार महिने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी अतिशय प्रतिकूल काळ होता.
सत्ता गेली, आमदार -खासदार सोडून गेले. पक्ष प्रवक्ते आणि विश्वासू मित्र संजय राऊत यांना तुरुंगात जावे लागले. मेहुण्याच्या काही मिळकतीवर इडीच्या धाडी पडल्या, पक्षाचे अस्तित्व दाखवणारे शिवसेना हे नावच इतिहासजमा होण्याची पाळी आली, धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले गेले. त्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांचे सहकारी यांनी मुख्य मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले. आदित्य ठाकरे यांनी गावोगाव दौरे करून फुटीर आमदारांना गद्दार म्हणून संबोधले, ५० खोके, एकदम ओके असे एक पालुपद प्रत्येक भाषणात लावून धरलं. दसरा मेळाव्यातही ५० खोक्यांच्या खोकासुराचे दहन करुन शिंदे गटाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला.
शिवतीर्थाची जागा मिळवण्यापासून अनेक कायदेशीर लढे उद्धव ठाकरे यांना द्यावे लागले. या घडामोडींमुळे अर्थातच सगळा फोकस उद्धव ठाकरे यांच्यावरच राहिला. वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प अचानकपणे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला ही बाब आदित्य ठाकरे यांनी जनतेसमोर आणली. वेदांत प्रकल्प महाराष्ट्रातच येईल, असे जाहीर सांगणारे एकनाथ शिंदे एकदम अडचणीत आले. त्यांनी त्यावेळी सारवासारव केली.
वेदांत पेक्षाही मोठे प्रकल्प आपण मिळवू असे सांगत त्यांना सारवासारव करावी लागली. यातही उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली. संभाजी ब्रिगेडशी युती केली, बंजारा समाजाचे एक महंत तसेच सुषमा अंधारे आदी नेते मंडळी हाताशी धरली. या सगळ्याचा परिणाम असा झाला की, भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे असे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. मुंबई आणि आसपासच्या महापालिकांमध्ये भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे असेच सामने होतील, असे चित्र निर्माण करुन उद्धव ठाकरे यांनी अर्धी लढाई जिंकली आहे.
या घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसची पंचाईत झाली. विधीमंडळ विरोधी पक्षनेते पद अजित पवार यांच्याकडे आहे. विरोधी पक्षनेते पद सांभाळताना अनेक गौप्यस्फोट करुन देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते. सभागृह दणाणून टाकले होते. ती धडाडी अजित पवार अजून तरी दाखवू शकलेले नाहीत. त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे कधीही भाजपमध्ये जातील, अशी हवा निर्माण झाली आहे.
खुद्द त्यांच्या पक्षातच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार या़च्यातील संबंध बिघडल्याची चर्चा आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात अजित पवार यांना भाषण करु दिले नाही, याची बोच त्यांच्या समर्थकांना अजूनही आहे. अशा विविध कारणांनी खंबीर विरोधी पक्षनेता अशी प्रतिमा अजित पवारांची होऊ शकलेली नाही. याउलट विरोधी पक्षाची निर्माण झालेली पोकळी (स्पेस) उद्धव ठाकरे भरून काढत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या जोडीवर उद्धव ठाकरे टीका करत असत. अलीकडे मात्र त्यांनी फक्त अमित शहा यांनाच लक्ष्य बनविले आहे. हा त्यांच्यातील बदल आश्चर्यकारक आहे आणि त्या बदलाची राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे. शिवाय शिवसेना हे नाव पुसले गेले आणि चिन्ह गोठवले गेले याविषयी सहानुभूती मिळवण्यात उद्धव ठाकरे यांना काही प्रमाणात यश आलेले आहे. याचा खुबीने वापर करत त्यांनी आपल्या समर्थकांमध्ये जान आणली आहे.