हे अ-राजकीय आहे बरंका!
कथेप्रमाणे राजकारण करणारी मंडळी मतदारांच्या आशा- अपेक्षांना खाऊन टाकतात. नव्याने नव्या मंदविष सापाजवळ करतात, तेव्हा बेडूकवृत सोडू या.
हितोपदेशात मंदविष सापाची कथा आहे. . . मंदविष साप ऋषीमुनीनी दिलेल्या शापामुळे एका सरोवराकाठी येतो. तू बेडकांचे वाहन होशील असा शाप त्याला दिलेला असतो. सरोवरापाशी त्याला एक बेडूक भेटतो. “शापामुळे मी बेडकांचे वाहन झालोय” असे सापाने सांगितल्यावर बेडूक खूष होतो. त्याला सापावर बसावेसे वाटते. पण राजाच्या अगोदर सापावर बसलो, तर राजा रागावेल म्हणून जलपाद या आपल्या राजाकडे ते वर्तमान सांगण्यासाठी जातो. सगळी माहिती देतो. जलपाद मं दविषाच्या पाठीवर बसतो. मंदविष जलपादला वाकडेतिकडे, लांबवर फिरवून आणतो. राजाला मजा वाटते. दुसऱ्या दिवशी परत फिरण्यासाठी राजा येतो.
मंदविष त्याला फिरवतो. राजा विचारतो, “आज इतकं सावकाश का? कालच्यासारखं सर सर का चालत नाहीस?” मंदविष सांगतो, “महाराज जेवण मिळत नाही. त्यामुळे अशक्तपणा आलाय. हे अ-राजकीय आहे बरं का! “तेव्हा जलपादाने जवळचे दोन बेडूक त्याच्या पुढे टाकले. तो म्हणाला, हे खा. मग नीट चाल. काम करायचे तर खायला हवे. मंदविषाने ते बेडूक खाल्ले. आणि सरसर फिरून दाखवले. मग रोज बेडकाचा खुराक सुरू झाला. जलपाद बेडूक देत असे. मंदविष स्वतः ही पकडून खात असे.
अखेर सर्व बेडूक सं पले. तेव्हा मंदविषाने जलपादालाही खाल्ले. आणि तो बेडकांच्या शोधात दसु ऱ्या सरोवराकडे निघतो. ही आहे हितोपदेशातली कथा. पंचतंत्र, इसापनीती यांसारख्या नीती कथांमध्येस्थल, काल आणि व्यक्तिसापेक्षता नसते. वर्षानुवर्षे त्या समाजाला आरसा दाखवत असतात.
हा आरसा पाहून आपण शहाणे व्हायचे की तसेच रहायचे हे आपला विचार आहे. आरशाला दोष द्यायचा की आपल्यात सुधारणा करायची, हा खरा मुद्दा. राजकारणापलीकडे जायला पाहिजे. कधी तरी राजकारण सोडून अराजकीय विचार, कृती केली पाहिजे. प्रश्न अनेक आहेत. बेरोजगारी, महागाई, कायदा- सुव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, पायाभूत मूलभूत सेवा यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये तर राजकारणापलीकडे जाऊन काम करणे आवश्यक आहे. दररोज कोणीतरी उठायचे आणि आरोप करायचे, त्यावर प्रत्यारोप करायचे आणि मग मूळ विषय तर संपून जातोच, पण हाताशी काहीच लागत नाही. हितोपदेशातल्या कथेप्रमाणे राजकारण करणारी मंडळी मतदारांच्या आशा-अपेक्षांना खाऊन टाकतात. नव्याने नव्या मंदविष सापाला जवळ करतात. परत एकदा त्याच्या पाठीवर बसतात आणि आपल्यातलीच मंडळी दानाला देतात. तेव्हा बेडूकवृत्ती सोडू या.
-मधुसूदन पतकी