प्रसिद्ध स्टँड-अप काॅमेडियनवर बलात्काराचा आरोप, गुन्हा दाखल
मुंबई | Khyali Saharan – प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन ख्याली सहारन (Khyali Saharan) अडचणीत सापडला आहे. ख्याली सहारनवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयपूरमधील एका 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप ख्यालीवर करण्यात आला आहे. याबाबत गुरुवारी (16 मार्च) पोलिसांनी माहिती दिली.
कॉमेडियन ख्याली सहारन हा आपचा कार्यकर्ता आहे. त्यानं एका तरूणीला नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्यानं मानसरोवर परिसरातील एका हॉटेलच्या खोलीत मद्यधुंद अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप ख्यालीवर करण्यात आला आहे. तसंच मानसरोवर पोलीस स्टेशनमधील उपनिरीक्षक संदीप यादव यांनी सांगितलं की, तरुणीनं दिलेल्या तक्रारीनंतर ख्यालीविरुद्ध आयपीसी कलम 376 (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगंगानगर येथील रहिवासी असलेली ही तरूणी एका फर्ममध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. त्यानंतर एका महिनाभरापूर्वी ती दुसऱ्या महिलेसोबत कामाच्या शोधात ख्यालीच्या संपर्कात आली होती. त्यावेळी आरोपी ख्यालीनं एका हॉटेलमध्ये दोन रुम बुक केल्या होत्या. एक स्वत:साठी आणि दुसरी दोन्ही महिलांसाठी. तेव्हा ख्यालीनं स्वत: बिअर प्यायली आणि त्या महिलांनाही बिअर पिण्यास भाग पाडलं. त्यानंतर एक महिला खोलीतून निघून गेली आणि त्यानं दुसऱ्या तरुणीवर बलात्कार केला.