महाभारताचे ‘शकुनी मामा’ काळाच्या पडद्याआड; अभिनेते गुफी पेंटल यांचं निधन
![महाभारताचे 'शकुनी मामा' काळाच्या पडद्याआड; अभिनेते गुफी पेंटल यांचं निधन gufi paintal](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/06/gufi-paintal-780x470.jpg)
मुंबई | Gufi Paintal Passed Away – छोट्या पडद्यावरील ‘महाभारत’ (Mahabharat) ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील प्रत्येक पात्रानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. यामध्ये ‘शकुनी मामा’ ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. पण आता प्रेक्षकांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. सर्वात गाजलेली ‘शकुनी मामा’ची (Shakuni Mama) भूमिका साकारलेले प्रसिद्ध अभिनेते गुफी पेंटल (Gufi Paintal) यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं संपूर्ण मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
प्रसिद्ध अभिनेते गुफी पेंटल यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खराब होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तसंच गुफी पेंटल यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मागील काही दिवसांपासून गुफी पेंटल यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना आयसीयूत ठेवण्यात आलं होतं. याबाबतची माहिती अभिनेत्री टीना घई यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली होती.
दरम्यान, गुफी पेंटल यांनी 1975 साली ‘रफू चक्कर’ या चित्रपटातून त्यांच्या करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी ‘महाभारत’ या मालिकेत ‘शकुनी मामा’ची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात अविस्मरणीय स्थान निर्माण केलं आहे.